"मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम PM मोदींच्या उपस्थितीत व्हावा"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 08:04 PM2023-07-19T20:04:09+5:302023-07-19T20:04:46+5:30

'घरोघरी तिरंगा' फडकवून दिन साजरा करण्याचा अध्यादेश काढा; राष्ट्रवादीच्या आमदाराची मागणी

"Amritmahotsav program of Marathwada liberation struggle should be held in the presence of PM Modi" | "मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम PM मोदींच्या उपस्थितीत व्हावा"

"मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम PM मोदींच्या उपस्थितीत व्हावा"

googlenewsNext

Pm Modi, NCP: मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा जाज्वल्य इतिहास मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवानिमित्त मराठवाड्यासह सबंध देशाला माहित व्हावा व या इतिहासाची जाणीव पुढच्या पिढीला असावी या दृष्टीने यंदाचा अमृत महोत्सवी मुक्तिसंग्राम दिन साजरा करण्यात येत आहे. या निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमास देशाचे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना निमंत्रित करावे, अशी विनंती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सेनानी व हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा सभागृहात मांडला होता. त्याचे धनंजय मुंडे यांनी समर्थन केले. तसेच, 'घरोघरी तिरंगा' फडकवून दिन साजरा करण्याचा अध्यादेश काढा अशी मागणीही मुंडे यांनी केली आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील विकासाचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी मंत्रिमंडळाची एक बैठक छत्रपती संभाजी नगरला घ्यावी, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

निजामाच्या राजवटीत झालेले अत्याचार व त्याविरुद्ध मराठवाड्याने दिलेला निकराचा लढा यामध्ये मराठवाड्यातील संत परंपरा, लढाऊ वृत्ती, ज्ञान, संस्कृती यांनी झालेली पायाभरणी, त्याचबरोबर मराठवाड्याला सुरुवातीपासून असलेला संघर्षाचा वारसा याचीही आठवण करून देत धनंजय मुंडे यांनी स्वातंत्र्य लढ्यात नेतृत्व केलेले स्वामी रामानंद तीर्थ, गोविंद भाई श्रॉफ, दिगंबरराव बिंदू, भाऊसाहेब वैशंपायन, राविणारायन रेड्डी, बाबासाहेब परांजपे आदी हुतात्म्यांचे स्मरण केले. त्याचबरोबर स्वातंत्र्यानंतरच्या विकासाच्या वाटचालीतील योगदान दिलेल्या स्व.शंकरराव चव्हाण, स्व.विलासराव देशमुख, स्व.गोपीनाथराव मुंडे आदी सर्वांचेच संस्मरण करत त्यांनाही अभिवादन केले. 

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा जाज्वल्य इतिहास हा पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणादायी असून या संग्रामाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना ज्याप्रमाणे देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात हरघर तिरंगा अभियान राबवून घरोघरी तिरंगा ध्वज उभारण्यात आला, त्याच धर्तीवर यंदा 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करताना घरोघरी तिरंगा ध्वज फडकवण्यात यावा, अशा पद्धतीचा अध्यादेश काढण्यात यावा अशी विनंती धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. 

मराठवाड्यात विकासाचा अनुशेष भरून काढण्यासह इथल्या नागरिकांच्या इतरही अनेक समस्या आहेत. मराठवाड्याला विकासाच्या वाटेवर अग्रेसर ठेवण्यासाठी मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजी नगर येथे मंत्रिमंडळाची विशेष बैठक घ्यावी व मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने व्यापक निर्णय घेण्यात यावेत, अशीही मागणी धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात केली. 

आजोळची सांगितली आठवण 

मराठवाड्याच्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासावर प्रकाश टाकताना धनंजय मुंडे म्हणाले की, निजाम काळात रझाकरांच्या अत्याचारांना सीमा उरली नव्हती. रझाकरांच्या अत्याचाराविरुद्ध गावे पेटून उठली होती. त्यांच्यातील संघर्षामध्ये एकदा एका गावामध्ये त्यांचा एक सेनापती गावकऱ्यांकडून मारला गेला, त्याचा राग म्हणून रझाकारांनी संपूर्ण गावच पेटवून दिले. ते गाव म्हणजे, देव धानोरा! त्या संपूर्ण गावाला पेटवून दिले म्हणून त्याला जळके धानोरा असेही नाव होते. त्या जळीत कांडात गावातील 14 जणांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. ते गाव आपले आजोळ असून, त्याच हुतात्मा कुटुंबाचा वारसा अपल्यालाही आपल्या आईकडून मिळालेला आहे, अशी आजोळची आठवण धनंजय मुंडे यांनी सांगितली. 

आपल्या आजोळी देव धानोरा येथे शहीदांचे स्मारक उभारलेले आहे, मात्र आता त्याची दुरावस्था झाली असून, राज्य शासनाने मराठवाडा मुक्तीसंग्रामचा जो अमृत महोत्सवी विशेष कार्यक्रम यावर्षी घोषित केला आहे, त्यातून या स्मारकांची नव्याने उभारणी करण्यात यावी, अशी अपेक्षाही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

Web Title: "Amritmahotsav program of Marathwada liberation struggle should be held in the presence of PM Modi"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.