"कोरोना आणि पेंग्विन महासरकार हे दोन व्हायरस..."; अमृता फडणवीसांचा हल्लाबोल
By ravalnath.patil | Published: October 25, 2020 04:25 PM2020-10-25T16:25:34+5:302020-10-25T16:30:46+5:30
Amruta Fadnavis : याआधीही अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा राज्यातील महाविकास राज्य सरकारवर टीका केली आहे.
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता तर कोरोना व्हायरस आणि पेंग्विन महासरकार व्हायरस कधी, केव्हा आणि कसे निष्पाप लोकांना आपल्या कचाट्यात घेईल, हे काही सांगता येत नाही, असे ट्विट करत टीका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी करणाऱ्याच्या आरोपाखाली पोलिसांनी समित ठक्कर या तरुणाला शनिवारी अटक केली आहे. या अटकेनंतर आनंद रंगनाथन यांनी ट्विट करत ठाकरे सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली. 'पावरलेस' मुख्यमंत्री असे समित ठक्कर यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ट्विट केले होते. यामुळे समितला अटक केली का? असा प्रश्न आनंद रंगनाथन यांनी ट्विट करत विचारला.
आनंद रंगनाथन यांच्या या ट्विटला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला महासरकार व्हायरसची उपमाच दिली आहे. "कोरोना व्हायरस आणि पेंग्विन महा सरकार व्हायरस हे दोन्हीही कधी, केव्हा आणि कसे निष्पाप लोकांना आपल्या कचाट्यात घेतील, हे काही सांगता येत नाही. क्वारंटाइन होण्यापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवा आणि नियमित मास्क वापरा. सुरक्षित राहा! गप्प बसा!," असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे.
दरम्यान, याआधीही अमृता फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा राज्यातील महाविकास राज्य सरकारवर टीका केली आहे.