देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद; पत्नी अमृता फडणवीस यांच्या ट्वीटची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 10:08 AM2022-07-01T10:08:43+5:302022-07-01T10:12:33+5:30

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अचानक घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

Amruta Fadnavis Reaction on Eknath Shinde CM Devendra Fadnavis Deputy CM Oath taking see Tweet | देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद; पत्नी अमृता फडणवीस यांच्या ट्वीटची चर्चा

देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद; पत्नी अमृता फडणवीस यांच्या ट्वीटची चर्चा

googlenewsNext

Amruta Fadnavis Reaction on Eknath Shinde Devendra Fadanvis: सुमारे १० दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर अखेर गुरूवारी भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आणि शिंदे उपमुख्यमंत्री होणार हे त्यांच्या शपथविधीच्या काही तास आधीपर्यंत लोकांना समजत होते. मात्र शपथविधीच्या काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वांनाच चकित केले. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री न केल्यामुळे देवेंद्र फडणवीस नाराज असल्याच्या बातम्या आल्या. पण भाजपाचे वरच्या फळीत नेते अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्यासह भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी या निर्णयाला देवेंद्र फडणवीस यांचा त्याग आणि समर्पण म्हटले. अशा परिस्थितीत देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेले ट्विट विशेष महत्त्वाचे ठरले.

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असून भाजपा त्यांना पाठिंबा देईल, असे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यावेळी बोलताना फडणवीस मंत्रिमंडळात सामील होणार नाहीत असेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र, या घोषणेनंतर दोन तासांच्या आत चक्र फिरली आणि शपथविधीआधी भाजपाच्या केंद्रीय पक्षनेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री होण्यास सांगितले. त्यानुसार फडणवीसांनीही शपथ घेतली. त्यानंतर अनेकांनी विविध पद्धतीने या दोघांचे अभिनंदन केले. त्यात, अमृता फडणवीस यांच्या ट्विटबद्दल चांगलीच चर्चा रंगली. नेहमी अमृता फडणवीस आपल्या ट्विटमधून भावनांना वाट करून देताना दिसतात. पण हे ट्वीट अतिशय सरळ-साधे व अत्यंत औपचारिक असल्याप्रमाणे दिसून आले. 'आपले (महाराष्ट्राचे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून अभिनंदन आणि वाटचालीसाठी शुभेच्छा', असे औपचारिक ट्विट करत त्यांनी दोघांचे अभिनंदन केले.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार नसल्याचे आधीच माहिती असल्याचे संकेत अमृता फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे दिले होते का? अशीही चर्चा रंगली. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या गेल्या दोन-अडीच वर्षांत राजकीय विषयांवर मत मांडताना दिसल्या. उद्धव ठाकरे यांचे सरकार आल्यानंतर अमृता फडणवीस सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना दिसल्या. एकनाथ शिंदे यांचे बंड सुरू झाल्यावरही त्यांनी बऱ्याच वेळा टीका केली. पण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार नसल्याचे संकेत अमृता फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणेच दिले होते अशी चर्चा झाली. कारण अमृता फडणवीस या देशाबाहेर काही कामानिमित्त गेल्या होत्या. राज्यात सत्तेची उलथापालथ सुरू असताना फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार अशी चर्चा रंगल्यानंतरही अमृता फडणवीस या देशाबाहेरच राहिल्या. अमृता यांचा राजकारणातील एकंदर रस पाहता फडणवीस मुख्यमंत्री होणार असते तर अमृता फडणवीस या लगबगीने भारतात आल्या असत्या. पण त्या भारतात परतल्या नाहीत, यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे संकेत दिले होते का? अशी चर्चा सध्या करण्यात येत आहे.

Web Title: Amruta Fadnavis Reaction on Eknath Shinde CM Devendra Fadnavis Deputy CM Oath taking see Tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.