Amruta Fadnavis Songs: महाशिवरात्रीला एक गाणं रिलीज झालं, पुढचा प्लॅन काय? अमृता फडणवीस म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 01:19 PM2022-07-09T13:19:37+5:302022-07-09T13:20:28+5:30
अमृता फडणवीस यांच्या आवाजातील शिवतांडव स्तोस्त्र तीन महिन्यांपूर्वी रिलीज झाले होते
Amruta Fadnavis Singing Future Plans: सुमारे १० दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर अखेर भाजपाच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री झाले. शपथविधी झाल्यानंतर काही वेळातच नव्या सरकारने कामांना सुरूवात केली. या साऱ्या रणधुमाळीत अमृता फडणवीस कुठेच दिसल्या नाहीत. पण त्यानंतर त्यांनी एक औपचारिक ट्वीट करत दोघांना शुभेच्छा दिल्या. फडणवीस हे वेषांतर करून एकनाथ शिंदे यांना भेटायला जायचे असा गौप्यस्फोट त्यांनी एक मुलाखतीत केला. त्यानंतर आता अमृता फडणवीस यांनी आणखी एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी स्वत:च्या कला क्षेत्रातील भविष्यातील प्रोजेक्टबद्दल सांगितले.
महाशिवरात्रीच्या दिवशी अमृता फडणवीस यांनी एक गाणे लाँच केले होते. त्या गाण्यानंतर पुढील त्यांचे काय प्लॅन्स आहेत, याबद्दल त्यांनी न्यूज १८ लोकमतला माहिती दिली. त्या म्हणाल्या की पुढील काही महिन्यांतच माझी नवी गाणी चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. "मी रेकॉर्ड केलेली आणि शूट केलेली २-३ गाणी आताही तयार आहे. खरं तर या महिन्यातच ती गाणी रिलीज होणार होती. पण काही कारणास्तव आता पुढच्या दोन-तीन महिन्यात आधी २ गाणी येतील. त्यानंतर आणखीही काही गाणी आहेत.", असे अमृता फडणवीस म्हणाल्या.
दरम्यान, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीस यांनी केलेल्या ट्वीटची चांगलीच चर्चा होती. नेहमी अमृता फडणवीस आपल्या ट्विटमधून भावनांना वाट करून देताना दिसतात. पण हे ट्वीट अतिशय सरळ-साधे व अत्यंत औपचारिक असल्याप्रमाणे दिसून आले होते. 'आपले (महाराष्ट्राचे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून अभिनंदन आणि वाटचालीसाठी शुभेच्छा', असे औपचारिक ट्विट करत त्यांनी दोघांचे अभिनंदन केले होते. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार नसल्याचे आधीच माहिती असल्याचे संकेत अमृता फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे दिले होते का? अशीही चर्चा रंगली. कारण देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या गेल्या दोन-अडीच वर्षांत राजकीय विषयांवर मत मांडताना दिसल्या. पण अमृता फडणवीस या देशाबाहेर काही कामानिमित्त गेल्या होत्या. राज्यात सत्तेची उलथापालथ सुरू असतानाही त्या देशाबाहेरच राहिल्या. त्यामुळे अशी चर्चाही दिसून आली.