आमुची मिराशी पंढरी! आमचे घर भीमातीरी!
By admin | Published: July 7, 2014 03:32 AM2014-07-07T03:32:16+5:302014-07-07T03:32:16+5:30
कर कटेवर ठेवून युगे अठ्ठावीस विटेवर उभा असलेल्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनओढीने पंढरीत तीन लाख भाविक दाखल झाले असून, पददर्शन रांग नऊ पत्राशेड भरून पुढे गेली आहे
जगन्नाथ हुक्केरी, पंढरपूर
‘आमुची मिराशी पंढरी। आमुचे घर भीमातीरी।।१।।
पांडुरंग आमुचा पिता। रखुमाई आमची माता।।२।।
भाऊ पुंडलिक मुनी। चंद्रभागा आमुची बहीण।।३।।
तुका जुनाट मिराशीं। ठाव दिला पायांपाशीं।।४।।’
कर कटेवर ठेवून युगे अठ्ठावीस विटेवर उभा असलेल्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनओढीने पंढरीत तीन लाख भाविक दाखल झाले असून, पददर्शन रांग नऊ पत्राशेड भरून पुढे गेली आहे. यामध्ये ८० हजार भाविक दर्शनासाठी थांबले आहेत; तर मुखदर्शन रांगही तुकाराम भवनाच्या पाठीमागे गेली आहे. वाळवंटात दाखल झालेले भाविक हरिजागरात तल्लीन झाले असून, हा सोहळा संपेपर्यंत वारकऱ्यांचे घर असलेल्या भीमातीरावर भक्तीचा सूर निनादणार आहे.
खेळ, धावा, रिंगण असा खेळ खेळत पंढरी समीप आल्याच्या आनंदाने ‘आनंदाच्या डोही आनंद तरंग’ असे म्हणत वारकऱ्यांनी पंढरीचे आदरातिथ्य स्वीकारत विठुरायाच्या पावन तालुक्यात प्रवेश केला.
पालख्या पंढरीत दाखल होणार असल्याने पालख्यांसोबतचे वारकरी आधीच पंढरपूर गाठून दर्शनासाठी पददर्शन रांगेत थांबत आहेत. एका भाविकाला पददर्शनासाठी आठ ते साडेआठ तास कालावधी लागत असल्याचे हादगाव (ता. केज, जि. बीड) येथील युवराज नामदेव यादव, राणाण्णा संताजी कोंडरू (रा. पिंपळा, ता. बिलोली, जि. नांदेड) यांनी सांगितले.
ज्ञानोबा भंडीशेगाव तर तुकोबा पिराची कुरोली येथील मुक्काम आटोपून सोमवारी वाखरीकडे रिंगण, खेळ, धावा करीत निघणार आहेत. पालख्या पंढरपूर समीप आल्याने भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असून, चंद्रभागेत पाणी आल्याने पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी लगबग सुरू झाली आहे.