इन्फ्लुएन्झा, कोरोना मैदानात; एकाचवेळी प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 06:22 AM2023-03-19T06:22:45+5:302023-03-19T06:25:50+5:30
हा विषाणू जुनाच असला तरी तज्ज्ञांनी मास्कचा आग्रह धरला आहे. त्याच्या जोडीने कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने चिंतेत भर पडली आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांत इन्फ्लुएन्झा या आजाराने सर्वांना त्रस्त केले आहे. त्याच्याच जोडीला आता कोरोनाही हळूहळू डोके वर काढू लागला आहे. दोन्ही आजाारंनी पुन्हा उचल खाल्ल्याने सर्वत्र चिंता आणि भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच आलेख भुईसपाट झाला होता. कोरोना संपल्यामुळे सुटकेचा नि:श्वास टाकला जात असताना इन्फ्लुएन्झा विषाणूच्या एच ३ एन २ या उपप्रकाराने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. हा विषाणू जुनाच असला तरी तज्ज्ञांनी मास्कचा आग्रह धरला आहे. त्याच्या जोडीने कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने चिंतेत भर पडली आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांचे मते, एच३ एन२ आणि कोरोना हे दोन्ही विषाणू नागरिकांच्या श्वसन व्यवस्थेवर हल्ला करतात. विशेष म्हणजे, दोन्ही विषाणूंमुळे होणाऱ्या आजाराच्या लक्षणांत कमालीचा एकसारखेपणा आहे. या विषाणूमुळे होणाऱ्या आजाराची लक्षणे सारखी असून त्यामध्ये खोकला, घशात खवखव, सर्दी, धाप लागणे आणि ताप या लक्षणांचा प्रामुख्याने समावेश आहे. तसेच या सर्व लक्षणांचा सहव्याधी असलेल्या रुग्णांना अधिक त्रास होतो. त्याकरिता ज्येष्ठांची आणि लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे.
प्रत्येक विषाणूमध्ये कालांतराने काही प्रमाणात जनुकीय बदल होत असतात. आजही या परिस्थितीला साधारण परिस्थिती म्हणूनच पाहत आहोत. जी काही दरवर्षी आम्ही औषधे या आजाराला देत आहोत तशीच देत आहोत. नागरिक अधिक प्रमाणात जागरूक झाल्याने याची सध्या चर्चा होत आहे. बाकी सगळे आहे तसेच सुरू आहे. नागरिकांनी तर मुळीच घाबरण्याची गरज नाही.सध्या जो काही इन्फ्लुएंझा ए चा उपप्रकार दिसत आहे तो अगदी जुना आहे. तसेच कोरोना आपल्याकडे यापूर्वीही होत आणि आजही आहे. त्यावर कोणत्या प्रकारचे उपचार करायचे.
- डॉ. जलील पारकर,
लीलावती हॉस्पिटल
रुग्णांना आता पालिका रुग्णालयांचा सहारा
शहर आणि उपनगरांतील जेजे, जीटी, कामा आणि सेंट जाॅर्ज रुग्णालयांत संपाच्या पाचव्या दिवशीही रुग्णसेवा रखडल्याचे चित्र होते, रुग्णांनीही आता शहर व उपनगरांतील पालिका रुग्णालयांमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केल्याने शनिवारी शासकीय रुग्णालयांत शुकशुकाट दिसून आला. शासकीय रुग्णालयांमध्ये संपामुळे सेवेवर झालेला परिणाम टाळण्यासाठी पालिका प्रशासनाकडून मनुष्यबळाचे साहाय्य घेतले आहे.
एच३ एन२ चे रुग्ण यावेळी अधिक प्रमाणात दिसत आहे. पूर्वी फार या विषाणूसाठी फार चाचण्या केल्या जात नसत. मात्र, यावेळी त्या केल्या जात आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत फार मोठी वाढ नाही. नागरिकांनी मात्र काळजी घेतली पाहिजे.
- डॉ. वसंत नागवेकर, साथरोग तज्ज्ञ, एच एन रिलायन्स हॉस्पिटल