गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; तेलंगणात भूकंपाचा केंद्रबिंदू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 08:33 AM2024-12-04T08:33:56+5:302024-12-04T09:07:07+5:30
भूकंपाच्या धक्क्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. या भूकंपाचे पडसाद अनेक ठिकाणी जाणवले.
गडचिरोली - तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. या भूकंपची तीव्रता ५.३ रिक्टर स्केल अशी नोंदविण्यात आलेली आहे. मुलुगु भूकंपाचे केंद्रबिंदू असले तरी महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहे. त्यामुळे याठिकाणी नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
याबाबत प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे. अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा असं आवाहन गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. या भूकंपाचे पडसाद अनेक ठिकाणी जाणवले. तेलंगणात भूकंपाचे तीव्र धक्के पाहता संबंधित विभाग मदतकार्यासाठी सज्ज झाल्याची चर्चा परिसरातील नागरिकांतून होत आहे.
An earthquake with a magnitude of 5.3 on the Richter Scale hit Mulugu, Telangana at 7:27 AM today: National Center for Seismology pic.twitter.com/PKq7BnFxke
— ANI (@ANI) December 4, 2024
गडचिरोली, अहेरी, सिरोंचा, अहेरी, एटापल्ली, चामोर्शी या तालुक्यांत घराच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांना भूकंपाचे धक्के अधिक जाणवले. घरातील फ्रीज, भांडी तसेच खिडक्यांच्या काचाही हलल्या. नागरिकांनी घराबाहेर पडून एकमेकांना विचारणा केली.
महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. या तीव्र भूकंपाच्या धक्क्याने कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याची माहिती सध्यातरी समोर आलेली नाही. प्रशासन परिस्थितीची माहिती घेत आहे. नागरिकांना भूकंपाच्या वेळी सतर्क राहण्याचा आणि गर्दीच्या किंवा असुरक्षित इमारतींपासून दूर राहण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. भूकंपाचा धक्का इतका तीव्र होता की लोक आपला जीव वाचवण्यासाठी घरातून आणि अपार्टमेंटमधून बाहेर पळू लागले. काही वेळ जमीन हादरली, जी त्यांना जाणवली. धक्क्याने खुर्च्यांवर बसलेले अनेक जण खाली पडले.