शिवसेनेच्या खासदारांना 'मातोश्री'चं बोलावणं; काय आदेश देणार उद्धव ठाकरे?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 05:35 PM2022-04-28T17:35:20+5:302022-04-28T17:35:40+5:30
गेल्या काही दिवसांपासून लाऊडस्पीकर, हनुमान चालीसा अशा अनेक कारणांमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
गेल्या काही दिवसांपासून लाऊडस्पीकर, हनुमान चालीसा अशा अनेक कारणांमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. दरम्यान, राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी शिवसेना खासदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. मातोश्रीवर शिवसेना खासदारांची ही बैठक पार पडणार आहे.
मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी २९ एप्रिल रोजी मातोश्रीवर शिवसेना खासदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. केंद्र सरकारकडे असलेली महाराष्ट्राची थकबाकी, पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर, यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच शिवसेनेच्या महाराष्ट्रातील १८ खासदारांनी यावर प्रहार करावा असे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडूनही शिवसेनेवर सातत्यानं हल्लाबोल केला जात आहे. तर दुसरीकडे लाउडस्पीकर हनुमान चालीस आणि अन्य विषयांवरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या बैठकीत यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. १ मे रोजी सायंकाळी औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची सभा होणार आहे. मात्र अशातच १ मे रोजीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील पुण्यात जाहीर सभा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी लवकरच जाहीर सभा घेऊन विरोधकांचा समाचार घेणार असल्याचे सांगितले होते.
उद्धव ठाकरे १ मे रोजी पुण्यात जाहीर सभा घेऊन विरोधकांचा चांगलाच समाचार घेण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी मशिदीच्या भोंग्यावरुन आक्रमक भूमिका घेतली असून भोंगे हटवण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांनी यावरून राज्य सरकारवरही टीका केली आहे. तसेच या मुद्द्यावरुन भाजपाने उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उभा केले आहेत. आता या सर्व टीकेला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार याची उत्सुकता आहे.