धुळवडीच्या दिवशी रंगाचा भंग! महाराष्ट्रात आठ जणांचा बुडून मृत्यू; रंग खेळून पोहणं जीवावर बेतलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 22:53 IST2025-03-14T22:52:19+5:302025-03-14T22:53:49+5:30
राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात पोहण्यासाठी गेलेल्या आठ जणांचा बुडून मृत्यू झाला. धुळवड साजरी केल्यानंतर हे तरुण पोहण्यासाठी गेले होते. पण, काळाने त्यांच्यावर झडप घातली.

धुळवडीच्या दिवशी रंगाचा भंग! महाराष्ट्रात आठ जणांचा बुडून मृत्यू; रंग खेळून पोहणं जीवावर बेतलं
धुळवडीच्या सणाच्या दिवशी महाराष्ट्रात आठ जणांचा मृत्यू झाला. ठाणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यांत या घटना घडल्या आहेत. यात एका १४ वर्षीय युवकाचाही समावेश आहे. वेगवेगळ्या घटनांत मृत्यू झालेले तरुण धुळवड खेलून पोहण्यासाठी गेले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बदलापुरात उल्हास नदीत बुडून चौघांचा मृत्यू
ठाणे जिल्ह्यातील बदलापूरजवळ असलेल्या राहटोली गावाजवळ असलेल्या पोद्दार संकुल आहे. शुक्रवारी (१४ मार्च) दुपारी तीन वाजताच्या सुमारास या संकुलातील काही तरुण रंगपंचमी खेळून झाल्यानंतर पोहण्यासाठी उल्हास नदीच्या पात्रात आले होते.
त्यातील एक जण बुडत असल्याची बाब लक्षात येताच त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकाला वाचवताना इतह तीन मित्रही पाण्यात बुडाले. बदलापूर अग्निशामक दलाच्याकडून कर्मचाऱ्यांनी शोध घेऊन त्यांचे मृतदेहर बाहेर काढण्यात आले.
प्राणहिता नदीत युवकाला जलसमाधी
सिरोंचा (गडचिरोली) : रंगपंचमीनंतर अंघोळीसाठी प्राणहिता नदीवर गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार (१४ मार्च) दुपारी २ वाजेच्या सुमारास महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवर घडली. कामपल्ला राजकुमार (वय २०, रा. वेमनापल्ली जि. मंचेरियाल-तेलंगणा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
सिरोंचा तालुक्याच्या मोयाबीनपेठा जवळील प्राणहिता नदीच्या पलीकडील भागापासून तेलंगणा राज्याची सीमा सुरू होते. याच हद्दीतील वेमनापल्ली गावातील कामपल्ली राजकुमार हा तरुण धुळवड खेळून मित्रांसोबत प्राणहिता नदी पात्रात अंघोळीकरिता आला होता. अंघोळ करताना तो खोल पाण्यात गेला. त्याला पोहता येत नव्हते. त्यामुळे तो बुडला.
१४ वर्षाच्या युवकाचा डोहात बुडून मृत्यू, दुसरा जखमी
आर्वी (वर्धा) : रंग खेळून झाल्यावर नाल्यावर आंघोळीस गेलेल्या एका बालकाचा मृत्यू झाला तर दुसरा नाका तोंडात पाणी गेल्यामुळे जखमी झाला. त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी घडली.
राजवीर संतोष सिंग तवर (वय 14 वर्ष, रा. मायबाई वार्ड) असे मृतक बालकाचे नाव आहे. सुजल गजानन चांदुरकर (वय 17 वर्ष, रा. मायबाई वार्ड) याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहे.
धरणात बुडून दोन मावस भावांचा मृत्यू
डोंगरखर्डा (यवतमाळ) : येथून जवळच असलेल्या खोरद येथील धरणात पोहण्यासाठी आठ जण गेले होते. त्यातील पाच जण बुडत असताना त्यातील तिघांना वाचविण्यात आले, तर दोन मावस भावांचा मृत्यू झाला. शुक्रवारी (१४ मार्च) धुळवड खेळून अंघोळीसाठी दुपारी धरणात उतरले असताना ही घटना घडली.
पंकज अशोकराव झाडे (वय ३५, रा. झाडगाव, राळेगाव), जयंत पंढरी धानफुले (वय २८, रा. मार्डी, ता.मारेगाव) अशी मृतांची नावे आहेत. ते दोघे अरुण भोयर यांच्या घरी पाहुणे म्हणून आलेले होते.