महादेव मंदिराच्या खांबातून पाझरतोय तेलसदृश्य पदार्थ; आठ-दहा दिवसांपासून 'चमत्कार'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 10:43 AM2022-12-11T10:43:37+5:302022-12-11T10:44:13+5:30
बांधकाम हेमाडपंथी आहे. गाभाऱ्यात चार दगडी खांब असून, त्यातील दोन खांबांतून तेल पाझरतेय...
करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील मिरगव्हाण येथील पुरातन महादेव मंदिरातील खांबातून तेलसदृश्य पदार्थ पाझरत आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. अचानक सुरू झालेल्या या प्रकाराने भाविकांतून आश्चर्य व्यक्त होत असून याविषयीच्या शास्त्रीय कारणांविषयी चर्चा होत आहे.
मिरगव्हाण हे गाव सिना नदीकाठी वसलेले असून, लोकसंख्या दोन हजार आहे. गावात इतर अनेक मंदिरे आहेत. त्यापैकी महादेवाच्या प्राचीन व पुरातन मंदिराच्या प्रवेशद्वार पूर्वेस आहे. बांधकाम हेमाडपंथी आहे. गाभाऱ्यात चार दगडी खांब असून, त्यातील दोन खांबांतून गोडे तेलासारखे फिकट पिवळ्या रंगाचे द्रव्य गेले आठ ते दहा दिवसांपासून पाझरत आहे. हे द्रव्य मंदिराच्या गाभाऱ्यात जमा होत असल्याने पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी होत आहे.
प्राथमिकरीत्या ही रासायनिक प्रक्रिया झाल्याची शक्यता आहे. दगडाची झीज होत असताना मंदिरास रंगकाम देण्यात आल्यानंतर दगड आणि रंग यांची रासायनिक प्रक्रिया होऊन तेलासारखा पदार्थ पाझरू शकतो. गावाशेजारी नदी आहे, शिवाय हिवाळ्यामुळे असा प्रकार होऊ शकतो.
- अमोल गोटे
सहायक संचालक, पुरातत्त्व विभाग, औरंगाबाद.