ठोस भूमिकेचा अव्यंग कुंचला
By Admin | Published: May 5, 2016 05:39 AM2016-05-05T05:39:47+5:302016-05-05T05:39:47+5:30
रोज सकाळी वर्तमानपत्र वाचल्यावर इतके विषय दिसतात, की व्यंगचित्र काढण्यासाठी हात अक्षरश: शिवशिवतात. पण काढले तरी छापायचे कुठे? आजमितीस व्यंगचित्रकारांना म्हणावे तसे व्यासपीठ उपलब्ध
रोज सकाळी वर्तमानपत्र वाचल्यावर इतके विषय दिसतात, की व्यंगचित्र काढण्यासाठी हात अक्षरश: शिवशिवतात. पण काढले तरी छापायचे कुठे? आजमितीस व्यंगचित्रकारांना म्हणावे तसे व्यासपीठ उपलब्ध नाही. म्हणूनच प्रसारमाध्यमांचा व्यंगचित्र आणि व्यंगचित्रकारांविषयीचा आदर हा एका दिवसापुरता मर्यादित नसावा. आज जागतिक व्यंगचित्रकार दिन आहे म्हणून दिवस साजरा करायचा आणि नंतर त्याकडे पाठ फिरवायची, असे होता कामा नये. किंबहुना सामाजिक भूमिका घेण्याच्या बाबतीत वर्तमानपत्रांचे जे दायित्व आहे ते लक्षात घेता, वर्तमानपत्रांनी प्रोत्साहन देऊन व्यंगचित्रकार उभे केले पाहिजेत. व्यंगचित्र ही कला आहे. ती आत्मसात करणे आणि तिची जोपासना करणे या दोन्ही गोष्टी कष्टसाध्य आहेत. म्हणूनच भाराभर व्यंगचित्रकार निर्माण होत नाहीत. तशात आहेत त्यांना व्यासपीठ आणि प्रोत्साहन मिळाले नाही, तर या कलेचे आणि समाजाचेही नुकसान अटळ बनते. ज्याला आपण लौकिकार्थाने कार्टून म्हणतो तो या कलेचा गाभा. अॅनिमेशन, राजकीय व्यंगचित्र, सामाजिक आशयाची व्यंगचित्रे हे त्याचे बाकीचे पैलू. त्यातही राजकीय व्यंगचित्र आणि अॅनिमेशन यांचा समाजावरील प्रभाव जगभरात लक्षणीय राहिला आहे. दुर्दैवाने भारतात दर्जेदार राजकीय व्यंगचित्रे अभावाने पाहायला मिळतात. राजकीय व्यंगचित्रासाठी नुसता विनोद पुरत नाही, त्यासाठी व्यंगचित्रकाराला भूमिका घ्यावी लागते. पटो वा ना पटो, लोकांना भूमिका घेतलेले भाष्य जास्त भावते. भूमिका घेणाऱ्या व्यंगचित्रकारांना त्याची पावतीही मिळते. डेव्हीड लोसारख्या दिग्गजाच्या बाबतीतील उदाहरण बोलके आहे. जर्मनीच्या हुकूमशहाला आपल्या सकस व्यंगचित्रातील पात्र बनविणाऱ्या आणि त्याबाबत राजकीय भूमिका घेणाऱ्या लो यांना जिवंत पकडून तरी आणा अन्यथा मेलेला तरी आणा, असे फर्मान अॅडॉल्फ हिटलरने सोडले होते. विनोदाच्या, विशेषत: व्यंगचित्राच्या माध्यमातून भूमिका घेणाऱ्यांना प्रोत्साहन मिळणे अत्यावश्यक आहे. पण अशी भूमिका घेण्यासाठी काही पूर्वअटी आहेत. व्यंगावर बोट ठेवायचे नाही. राजकीय समज आणि हातातील कला यांचा संगम लीलया झाला पाहिजे. व्यंग दिसण्याची दृष्टी उपजत असावी लागते. व्यंगचित्र ही सर्व चित्रांमधील शेवटची पायरी. ती गाठताना दृष्टी आणि सरावाच्या जोडीला आशय आणि भूमिकेची जोड लागते. व्यंगचित्रांच्या बाबतीत स्वत:चे स्थान निर्माण करताना जी राजकीय भूमिका घ्यावी लागते, त्यासाठी मुबलक वाचन आणि अफाट संदर्भ आवश्यक ठरतात. ते गाठीशी असतील तेव्हाच कल्पना सुचणे आणि तिचा नेमकेपणाने विस्तार करणे शक्य होते. त्यातून व्यंगचित्र जास्त प्रभावी बनते. व्यंगचित्रकार हा पूर्णवेळ पेशा बनविता येणे शक्य आहे. प्रबळ इच्छेची जोड त्याला मिळावी लागते. सौंदर्यदृष्टी शाळेच्या पातळीवरच निर्माण करून जोपासावी लागते. व्यंगचित्र कलेसाठी पोषक वातावरण निर्माण करायचे असेल तर चित्रकला हा ऐच्छिक विषय ठेवून चालत नाही. सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी गाजलेल्या युरोपात चित्रकला हा ऐच्छिक विषय नाही. त्याचे अपेक्षित परिणाम युरोपात प्रकर्षाने जाणवतात. तेथे ही दीक्षा देणाऱ्या शिक्षकाला मान असतो. तेच शिक्षक मानवंत विद्यार्थी घडवू शकतात. पाश्चिमात्य जगात व्यंगचित्रांना पोषक अशी संस्कृती आहे. म्हणूनच जंगलबुकसारखा अॅनिमेशनपट तयार करताना तब्बल १,३00 कोटी रुपये खर्च करताना त्यांचा हात आखडत नाही. मनही कचरत नाही. तसा संस्कार आपल्याकडेही होण्यासाठी या दिवसाचे निमित्त मिळाले तर ते हवे आहेच की!