शिवछत्रपतींच्या घरात फूट पाडणारे अनाजीपंत आजही अस्तित्वात : धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 09:01 PM2019-08-06T21:01:38+5:302019-08-06T21:02:41+5:30
‘‘भारतीय जनता पक्ष म्हणजे काशीचा घाट झाला आहे. पक्षात मेगाभरती करून गुन्हेगारांना पवित्र पावन करून घेण्याचे काम चालले आहे...
जुन्नर : शिवरायांची जन्मभूमी किल्ले शिवनेरीवर मातीचा कलश हाती घेत विरोधकांना संपवून नव्या स्वराज्यस्थापनेची शपथ घेत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवनेरी ते रायगड या शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. राजमाता जिजाऊ व बाल शिवबा यांच्या शिल्पाचे पूजन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी करून विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा बिगुल वाजविला. ‘शिवछत्रपतींच्या घराण्यामध्ये फूट पाडणारे अनाजीपंत आजही अस्तित्वात आहेत,’ अशी टीका या वेळी धनंजय मुंडे यांनी केली.
शिवनेरीवरील अभिवादन सोहळ्यानंतर शिवस्वराज्य यात्रेच्या शुभारंभाच्या सभेचे आयोजन जुन्नर येथील कृषी उत्पन्न बाजार समीतीत करण्यात आले होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अतुल बेनके, सत्यशील शेरकर, राष्ट्रवादी प्रदेश युवा अध्यक्ष महेबूब शेख, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौजिया खान, विद्या चव्हाण, रूपाली चाकणकर, पूजा बुट्टे-पाटील, उज्ज्वला शेवाळे या वेळी उपस्थित होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, ‘‘राज्य शासनाने गेल्या ५ वर्षांत नुसत्या घोषणा केल्या. त्यामुळे राज्य हे कर्जबाजारी झाले. लोकांवर विविध कर लादले. कर वाढवून लोकांच्या खिशावर फडणवीस सरकारने घाऊक दरोडा टाकला आहे. नवीन युवा नेतृत्वाच्या माध्यमातून पक्ष पुन्हा कात टाकून उभा राहणार आहे.’’
धनंजय मुडे म्हणाले, ‘‘भारतीय जनता पक्ष म्हणजे काशीचा घाट झाला आहे. पक्षात मेगाभरती करून गुन्हेगारांना पवित्र पावन करून घेण्याचे काम चालले आहे. शिवाजीमहाराजांच्या स्मारकाची घोषणा हवेत विरली असून शिवछत्रपतींच्या नावाने आणलेल्या कर्जमाफीने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. यातून शासनाने शिवरायांचा अपमान केला आहे.’’
भुजबळ म्हणाले, ‘‘शिवछत्रपतींच्या नावाने सरकारने फसवी कर्जमाफी आणली. आता शिवाजीमहाराज असते तर त्यांनी राज्यकर्त्यांचा कडेलोट केला असता. पीकविम्यात एका जिल्ह्यात १७३ कोटी गोळा होतात. शेतकºयांना फक्त ३० कोटी वाटले जातात. यात कंपन्यानंचा फायदा आहे.’’ सेना-भाजपच्या राज्यात शेतकरी, व्यापारी, उद्योजक आत्महत्या करीत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
अजित पवार म्हणाले, ‘‘जनता पुरात, तर राज्यकर्ते प्रचारात मग्न आहेत.’’ जनता महत्त्वाची की प्रचार महत्त्वाचा, असा सवाल करीत, शेतीप्रधान महाराष्ट्र राज्याला कृषिमंत्री नाही, ही शेतकºयांची थट्टा असल्याची टीका त्यांनी केली. पीकविम्याचे पैसे शेतकºयांना मिळत नाहीत, यासाठी सत्ताधारी शिवसेना मोर्चे काढते. यांच्यात सरकार चालविण्याची कुवत नाही. यांच्या राज्यात गरीब अधिकच गरीब होत आहेत, तर अदानी, अंबानी यांच्यासारखे उद्योगपती अधिकच श्रीमंत झाले आहेत, असा आरोप त्यांनी केला.
......
जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रद्द केले, हा केंद्र सरकारने चांगला निर्णय घेतला. देशाची अखंडता टिकविण्यासाठी हा निर्णय आवश्यक होता. एवढ्यावर न थांबता पाकव्याप्त काश्मीरही ताब्यात घेतले पाहिजे. देश आपल्या पाठीशी राहील, असे अजित पवार यांनी सांगितले. देश सरकारच्या पाठीशी राहील. ईव्हीएमबाबत शंका व्यक्त करताना राज्यात मतपत्रिका वापरून निवडणुका घ्यावात, या मागणीसाठी मुंबईत २१ ऑगस्टला सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन केल्याची माहितीही पवार यांनी दिली.
शुभारंभालाच उदयनराजे यांची दांडी
शिवस्वराज्य यात्रेच्या जाहिरातीत ‘उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघणार’ असे फलक लागले होते. परंतु, यात्रेच्या शुभारंभालाच उदयनराजे भोसले अनुपस्थित राहिल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.
.......
सरकारने पाच वर्षांत काहीच काम केले नाही; म्हणून यात्रा काढत आहेत. त्यांच्या यात्रा ‘मीच मुख्यमंत्री होणार’ हे सांगण्यासाठी आहेत. आमच्या शिवस्वराज्य यात्रेत मावळा बनण्याची चढाओढ आहे. याद्वारे नव्या स्वराज्याचा नवा लढा लढला जाणार आहे. - अमोल कोल्हे, खासदार
.......