शिवछत्रपतींच्या घरात फूट पाडणारे ‘अनाजीपंत’ आजही अस्तित्वात- धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 04:03 AM2019-08-07T04:03:47+5:302019-08-07T06:47:35+5:30
शिवनेरीवरून राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेचा शुभारंभ
जुन्नर : शिवरायांची जन्मभूमी किल्ले शिवनेरीवर मातीचा कलश हाती घेत विरोधकांना संपवून नव्या स्वराज्यस्थापनेची शपथ घेत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवनेरी ते रायगड या शिवस्वराज्य यात्रेचा बुधवारी प्रारंभ करण्यात आला. राजमाता जिजाऊ व बाल शिवबा यांच्या शिल्पाचे पूजन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी करून विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा बिगुल वाजविला. ‘‘शिवछत्रपतींच्या घराण्यामध्ये फूट पाडणारे अनाजीपंत आजही अस्तित्वात आहेत,’’ अशी टीका या वेळी धनंजय मुंडे यांनी केली.
शिवनेरीवरील अभिवादन सोहळ्यानंतर जुन्नर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात झालेल्या सभेत अनेक नेत्यांनी युती सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. धनंजय मुडे म्हणाले, ‘‘भारतीय जनता पक्ष म्हणजे काशीचा घाट झाला आहे. पक्षात मेगाभरती करून गुन्हेगारांना पवित्र पावन करून घेण्याचे काम चालले आहे. शिवाजीमहाराजांच्या स्मारकाची घोषणा हवेत विरली असून शिवछत्रपतींच्या नावाने आणलेल्या कर्जमाफीने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे.’’
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, ‘‘राज्य शासनाने गेल्या ५ वर्षांत नुसत्या घोषणा केल्या. त्यामुळे राज्य कर्जबाजारी झाले असून कर वाढवून फडणवीस सरकारने लोकांच्या खिशावर घाऊक दरोडा टाकला आहे.’’ तर जनता पुरात, तर राज्यकर्ते प्रचारात मग्न आहेत. जनता महत्त्वाची की प्रचार महत्त्वाचा, असा रोकडा सवाल अजित पवार यांनी केला.
शुभारंभाला उदयनराजे यांची दांडी
या यात्रेच्या जाहिरातीत ‘उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघणार’ असे फलक लागले असतानाच यात्रेच्या शुभारंभालाच उदयनराजे भोसले अनुपस्थित राहिल्याने उपस्थितांमध्ये चर्चा होती.
पवारांच्या टीकेला महाजनांचे प्रत्युत्तर
जामनेर (जळगाव) - नाशिकमध्ये पूरस्थिती असताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तिरंगा घेऊन नाचत होते, अशी टीका पवार यांनी भाषणात केली. त्यावर नाशिक जिल्ह्यात पूर स्थिती गंभीर असताना एनडीआरएफच्या टीमसोबत कमरे इतक्या पाण्यात फिरलो, अडकलेल्या नागरिकांना वाचविले. मला परिस्थितीचे गांभीर्य कळते. तुमच्यासारखा मी धरणात पाणी नाही तर काय करू... असे बोलत नाही, असे प्रत्युत्तर महाजन यांनी जामनेर येथे पत्रकार परिषदेत दिले.