Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

By नंदकिशोर पाटील | Published: November 17, 2024 07:49 AM2024-11-17T07:49:46+5:302024-11-17T07:51:48+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: लाडकी बहीण योजनेचा महायुतीकडून प्रभावी प्रचार; लोकसभेतील यशामुळे आघाडीचा दुणावला विश्वास!  

Analysis of Assembly Elections 2024 in Marathwada; Manoj Jarange factor, soybean factor will be decisive for Mahavikas Aghadi and Mahayuti | Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

छत्रपती संभाजीनगर : सुमारे सव्वादोनशे वर्षांच्या निजामी राजवटीतून मुक्त झाल्यापासून गेल्या पंचाहत्तर वर्षांतील मराठवाड्यातील राजकीय इतिहासावर नजर टाकली, तर इथल्या राजकारणाचा लंबक राष्ट्रवादी विचारांकडून सांस्कृतिक राष्ट्रवादाकडे झुकल्याचे दिसून येईल. मराठवाड्यातील राजकीय वाटचालीत प्रामुख्याने तीन प्रकारची राजकीय स्थित्यंतरे दिसून येतात. 

स्वातंत्र्यपूर्व काळ ते मराठवाडा मुक्तीसंग्रामापर्यंत या प्रदेशावर आर्य समाजाचा पगडा होता. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मुक्तीसंग्रामाचा लढा लढला गेला. त्यांच्याच नेतृत्वाखाली पुढे राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून तब्बल चार दशके काँग्रेसने या प्रदेशावर राज्य केले. 

महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरच्या गेल्या ६४ वर्षांत या प्रदेशाने शंकरराव चव्हाण, शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख  आणि अशोकराव चव्हाण, असे चार मुख्यमंत्री दिले. आणीबाणीनंतरच्या दशकात शेतकरी कामगार पक्षाचे प्राबल्य या प्रदेशात होते. 

१९७७ च्या लोकसभा निवडणुकीत आठ पैकी सात जागा शेकापने जिंकल्या होत्या. शेकापची जागा पुढे नव्वदच्या दशकात शरद पवारांनी स्थापन केलेल्या समाजवादी काँग्रेसने घेतली. विद्यापीठ नामांतरानंतर मात्र बहुजन समाजातील तरुणांनी काँग्रेसची साथ सोडून बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा हाती घेतला. 

गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी माळी, वंजारी आणि धनगर या ओबीसी समाज घटकांच्या राजकीय आकांक्षा उंचावणारा  ‘माधव’ फॉर्म्युला आणल्याने शिवसेना-भाजप युती आणखीच बळकट झाली. 

हा सर्व इतिहास सांगण्यामागचे कारण असे की, या प्रदेशातील राजकारणाला जातीय वळण मिळाले असून, हा सामाजिक-जातीय दुभंग या निवडणुकीतील ‘एक्स’ फॅक्टर बनला आहे. याच फॅक्टरने लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीची दाणादाण उडवली. 

आठ पैकी सात जागांवर महायुतीचे उमेदवार पराभूत झाले. यात रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, प्रताप चिखलीकर यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश होता.

सुमारे दीड वर्षापूर्वी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या छोट्याशा गावातून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाने बघता-बघता राज्याचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्र इतके व्यापून टाकले की, अंतरवाली हे राजकीय केंद्र आणि जरांगे हे न्यूज मेकर बनले ! 

आंदोलनाची धग आता कमी झाली असली, तरी यातून पुढे आलेला मराठा, मुस्लीम आणि दलित एकीकरणाच्या ‘एमएमडी’ फॉर्म्युल्याने प्रत्येक मतदारसंघातील समीकरणे बदलून टाकली आहेत. 

या ‘एमएमडी’ला उत्तर म्हणून काही ठिकाणी ‘माधव’चे पुनरुज्जीवन झाल्याने दिसून येते. ४६ विधानसभा मतदारसंघांपैकी ३५ मतदारसंघांत महायुतीची पिछाडी झाली. ती तूट भरून काढणे हे मोठेच आव्हान आहे.

आणखी एक मोठा फॅक्टर या प्रदेशात आहे. तो म्हणजे, सोयाबीन उत्पादक शेतकरी!  आठही जिल्ह्यांतील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी पाणी टंचाई, दुष्काळ असा विषय होता, तर यावेळी अतिवृष्टी आणि पिकांना भाव हे प्रमुख मुद्दे आहेत. 

काय अनुकूल, काय प्रतिकूल?

महाविकास आघाडी अनुकूल बाबी

-लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे दुणावलेला आत्मविश्वास.
- लोकसभा निवडणुकीतून तयार झालेली मुस्लीम-दलितांची वोट बँक.
-मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाचा पाठिंबा.
-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी.

प्रतिकूल बाबी 

-महायुतीच्या तुलनेत अपुरी प्रचार यंत्रणा.
-संपूर्ण प्रदेशावर प्रभाव पडेल अशा नेत्यांची वानवा.
-केवळ मतविभागणीवर विसंबून असलेले उमेदवार.
-उशिरापर्यंत लांबलेले जागावाटप.

महायुती अनुकूल बाबी

-लाडकी बहीण योजनेचा प्रभावी प्रचार.
-नरेंद्र मोदी यांच्यासह प्रभावी नेतृत्वाची फळी.
-ओबीसी मतांचे ध्रुवीकरण.
-मराठवाडा वॉटर ग्रीड, टोयाटो, जेएसडब्ल्यूसारख्या मोठ्या प्रकल्पांच्या माध्यमातून येऊ घातलेली गुंतवणूक.

प्रतिकूल बाबी  

-सोयाबीन उत्पादकांची नाराजी.
-मराठा समाजाचा जरांगे फॅक्टर.
-काही मतदारसंघांत झालेली बंडखोरी.
-लोकसभा निवडणुकीतील पिछाडी.

मैत्रीपूर्ण लढती

1) आष्टी मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाविरुध्द महायुतीमधील भाजप आणि अजित पवार गटाचाही उमेदवार आहे. येथे भाजप, अजित पवार गटात मैत्रीपूर्ण लढत आहे. 
2) नांदेड उत्तरमध्ये शिंदेसेनेविरुध्द काँग्रेस आणि उध्दवसेनेचा उमेदवार आहे. येथे महाविकास आघाडीतील काँग्रेस व उध्दवसेनेत मैत्रीपूर्ण लढत आहे.

चित्र कसे बदलत गेले ?

स्वातंत्र्योत्तर काळापासून आणीबाणीपर्यंत काँग्रेसचे एकछत्री राज्य होते. अपवादात्मक ठिकाणी शेकाप आणि कम्युनिस्टांचे उमेदवार निवडून येत असत.

आणीबाणीनंतरच्या अर्धदशकात भाई उद्धवराव पाटील, केशवराव धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाचे प्राबल्य वाढले. मात्र, नंतरच्या काळात प्रभावी नेतृत्वाअभावी या चळवळतील अनेकजण काँग्रेसमध्ये सामील झाले.

१९८० ते ९५ या पंधरा वर्षांच्या काळात हा प्रदेश शंकरराव चव्हाण आणि शरद पवारांच्या प्रभावाखाली राहिला.

विद्यापीठ नामांतरानंतर मराठवाड्यात शिवसेनेचे प्रस्थ वाढले. बहुजन समाज शिवसेनेकडे सरकला.

याच काळात विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे या दोन नेत्यांचा राज्यात प्रभाव वाढला. १९९५ साली भाजप-सेनेचे युती सरकार सत्तेवर येण्यास या दोघांच्या ‘मैत्री’चा हातभार कसा लागला हे सर्वांना माहिती आहे.

२०९९ साली काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस नावाने स्वतंत्र राजकीय चूल मांडली; परंतु मतदारांनी त्यांना पुन्हा एकत्र आणले. विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही काँग्रेसचे सरकार आले. जे पुढे पंधरा वर्षे टिकले!

२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीपासून आलेल्या मोदी लाटेने मराठवाड्याचे राजकारणही बदलून गेले. मराठवाड्यात कधी नव्हे ते भाजपने काँग्रेस आणि शिवसेनेहून अधिक जागा जिंकल्या.

२०१९ मध्ये भाजपचा एक आमदार वाढला; मात्र मतांची टक्केवारी किंचित (०. ६० टक्के) कमी झाली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे चारही उमेदवार पराभूत झाले. आठपैकी केवळ औरंगाबादची एक जागा महायुतीला मिळाली.

- लातूरमध्ये काँग्रेसच्या अमित देशमुखांविरोधात शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर उमेदवार आहेत.

- भोकरमध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव     चव्हाण यांची कन्या श्रीजया भाजपकडून     निवडणूक रिंगणात आहेत. त्यांचा सामना काँग्रेसचे तिरुपती कदम यांच्याशी होत आहे. 

-लोहा मतदारसंघात माजी खासदार प्रतापराव चिखलीकर (अजित पवार गट) आणि शेकापच्या आशा शिंदे या सख्ख्या बहीण-भावात सामना रंगत आहे. 

-कन्नडमध्ये संजना जाधव (शिंदेसेना) आणि हर्षवर्धन जाधव (अपक्ष) या पती-पत्नीमधील लढतीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

अशा होताहेत लढती

महायुतीचे उमेदवार 
-भाजपचे उमेदवार    २०
काँग्रेसविरुध्द     १० 
राष्ट्रवादी शप विरुध्द    ०७
उध्दवसेनेविरुध्द    ०३

-शिंदेसेनेचे उमेदवार    १७
काँग्रेसविरुध्द     ०४
राष्ट्रवादी शप विरुध्द    ०२
उध्दवसेनेविरुध्द     ११ 

-अजित पवार गट उमेदवार    १०
काँग्रेसविरुध्द     ०१
राष्ट्रवादी शप विरुध्द    ०७ 
उध्दवसेनेविरुध्द    ०२  

Web Title: Analysis of Assembly Elections 2024 in Marathwada; Manoj Jarange factor, soybean factor will be decisive for Mahavikas Aghadi and Mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.