अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांची परवडच

By admin | Published: September 25, 2016 02:16 AM2016-09-25T02:16:44+5:302016-09-25T02:16:44+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना धक्क्यांवर धक्के मिळत आहेत. अभियांत्रिकीच्या चौथ्या सत्राचा निकाल जाहीर झाल्यानंतर

Analyzes of Engineering Branch students | अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांची परवडच

अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांची परवडच

Next

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना धक्क्यांवर धक्के मिळत आहेत. अभियांत्रिकीच्या चौथ्या सत्राचा निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपत्रिकांत अनेक परीक्षार्थींना अनुपस्थित दाखविण्यात आले आहे. ही चूक नेमकी का झाली आहे याला कोण जबाबदार आहे, हे अद्यापही परीक्षा विभागाच्या लक्षात आलेले नाही. या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या सत्रात ‘कंट्रोल सिस्टम’ नावाचा पेपर असून या पेपरमध्येच विद्यार्थ्यांना जास्त प्रमाणात अनुपस्थित दाखविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना याबाबत महाविद्यालय तसेच विद्यापीठात विचारणा केली. परंतु कुठलेही ठोस उत्तर त्यांना मिळाले नाही. यासंदर्भात परीक्षा नियंत्रक डॉ.नीरज खटी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असा घोळ झाला असल्याचे मान्य केले. ‘कंट्रोल सिस्टम’ या पेपरमध्ये हे प्रमाण अधिक असून याचे कारण शोधण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
नागपूर विद्यापीठाने निकालांचे काम एका खासगी कंपनीला दिले आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अनुपस्थित किंवा अनुत्तीर्ण दाखविण्याचे प्रकार याअगोदरदेखील झाले आहेत. प्रत्येकवेळी अशी चूक तांत्रिक असल्याचेच उत्तर देण्यात येते. परंतु कंपनीवर कुठलीही कारवाई करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)

विद्यार्थ्यांचे ‘प्लेसमेन्ट’ धोक्यात
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकन सुरू झाल्यामुळे निकालांचे घोळ कमी होतील, अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात आता तर पेपर न तपासताच निकाल जाहीर होत असल्याचे दिसून येत आहे. अभियांत्रिकीच्या आठव्या सत्रातील वैकल्पिक विषयांचे पेपरच तपासण्यात आले नाही व यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेत अनुत्तीर्ण दाखविण्यात आले. यातील बऱ्याच विद्यार्थ्यांचे विविध नामांकित कंपन्यांमध्ये ‘प्लेसमेन्ट’ झाले आहे. अशा स्थितीत विद्यापीठाच्या चुकीमुळे या विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.
अभियांत्रिकीच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन’ शाखेच्या सहाव्या सत्रातील ‘कॉम्प्युटर सिस्टम’ आणि आठव्या सत्रातील ‘रॅनडिम सिग्नल थेअरी आणि सॅटेलाईट कम्युनिकेशन’ असे वैकल्पिक विषय आहेत.
या पेपरची तपासणी होण्याआधीच विद्यापीठाने निकाल जाहीर केला. ज्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हे इलेक्टिव्ह विषय घेतले होते त्यांना गुणपत्रिकेत अनुत्तीर्ण किंवा अनुपस्थित दाखवण्यात आले. या विषयातील सर्वच विद्यार्थी अनुत्तीर्ण कसे झाले याची महाविद्यालयांनी चौकशी केली असता तेव्हा ही बाब समोर आली. त्यानंतर या वैकल्पिक विषयांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यात आली. परंतु अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका मिळालेली नाही.
यासंदर्भात परीक्षा नियंत्रक डॉ. नीरज खटी म्हणाले, ही चूक महाविद्यालयांमुळेच झाली आहे. विद्यार्थ्यांनी वैकल्पिक विषय बदलले. परंतु याची माहिती महाविद्यालयांनी विद्यापीठाला दिली नाही. त्यामुळे अनेकांचे निकाल अनुपस्थित म्हणून आले.
————-
पुनर्मूल्यांकनाचाही गोंधळ सुरूच
अभियांत्रिकीच्या अनेक परीक्षांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. अद्याप पुनर्मूल्यांकनाचा निकाल हाती नाही आणि दुसरीकडे पुरवणी परीक्षा तोंडावर अशा कात्रीत विद्यार्थी सापडले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना आपल्याला कमी गुण मिळाले अशी शंका आल्याने त्यांनी विद्यापीठाच्या प्रक्रियेप्रमाणे उत्तरपत्रिकांच्या ‘झेरॉक्स’ प्रतींसाठी अर्ज केले. या प्रतींच्या आधारावर विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला. परंतु तीन महिने उलटून गेल्यावरदेखील अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांना निकालाचीच प्रतीक्षा आहे. मागील हिवाळी परीक्षांच्या पुनर्मूल्यांकनाचे निकालदेखील गेल्या पाच महिन्यांपासून मिळाले नसल्याची काही विद्यार्थ्यांची तक्रार आहे.

Web Title: Analyzes of Engineering Branch students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.