नित्यनवीन नेपथ्य निर्मितीतच आनंद - बाबा पार्सेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 03:39 AM2017-11-07T03:39:02+5:302017-11-07T03:39:08+5:30
मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांना राज्य शासनातर्फे देण्यात येणारा ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांना राज्य शासनातर्फे देण्यात येणारा ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. गेली तब्बल पाच दशके त्यांनी नेपथ्य निर्मिती करत रंगभूमीवर अमूल्य योगदान दिलेले आहे. ‘असुनी नाथ मी अनाथ’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘सुरुंग’, ‘मला उत्तर हवंय’, ‘मला काही सांगायचंय’, ‘श्री तशी सौ’अशा अनेक नाटकांपासून अलीकडेच रंगभूमीवर आलेल्या ‘यस माय डिअर’ या नाटकापर्यंत त्यांनी आपल्या नेपथ्याचा ठसा रंगभूमीवर उमटवला आहे. या पुरस्काराचे औचित्य साधत बाबा पार्सेकर यांच्याशी ‘लोकमत’चे प्रतिनिधी राज चिंचणकर यांनी साधलेला विशेष संवाद...
प्रश्न- या पुरस्काराबद्दल तुमच्या काय भावना आहेत?
उत्तर - हा पुरस्कार पडद्यामागच्या कलाकाराला दिला गेला, याचा आनंद मोठा आहे. दुसरे म्हणजे, हा पुरस्कार प्रभाकर पणशीकर यांच्या नावाने आहे. त्यांचे व माझे खूप जुने संबंध होते. आम्ही दोघेही गोव्याचे! आम्हाला एकमेकांविषयी प्रचंड आदर! त्यामुळे पणशीकरांच्या नावाने हा पुरस्कार मिळाला याचे मोठे समाधान मला आहे.
गेली पाच दशके तुम्ही नाट्यक्षेत्रात कार्यरत आहात. नेपथ्य निर्मितीच्या दृष्टीने तेव्हाचा आणि आताचा काळ यात विशेष काही फरक जाणवतो का?
१९६४मध्ये मी व्यावसायिक रंगभूमीवर नेपथ्यकार म्हणून पदार्पण केले. आता काळाच्या ओघात या क्षेत्रात फरक झालेला आहेच. नेपथ्याच्या बाबतीत म्हणायचे तर आता सगळेकाही ‘रेडिमेड’ झाले
आहे. त्या काळी आमचे पेंटर हाताने रंगवून नेपथ्य उभे करायचे. नाटकात एखादा बगिचा, रस्ता किंवा महाल वगैरे दाखवायचा असेल, तर तो पडद्यावर प्रत्यक्ष रंगवला जायचा. तो तयार झाल्यावर आपण खरेच त्या स्थळी उभे आहोत, असा फील यायचा. आता कॉम्प्युटरवर डिझाईन तयार करतात आणि हवा तो इफेक्ट आणला जातो.
मराठी नाटक आजही दिवाणखान्यातून बाहेर पडायला मागत नाही, असा एक आक्षेप नोंदवला जातो, त्याबद्दल तुमचे मत काय?
लेखक जेव्हा नाटक लिहितो, तेव्हा अनेकदा तो दिवाणखान्याला गृहीत धरूनच चाललेला दिसतो. पण असे नेपथ्य साकारायचे असले तरी त्यातही काय वेगळेपणा आणता येईल, याचा नीट विचार करतो. संहितेची गरज असेल त्याप्रमाणे विचार करून नेपथ्यात आवश्यक ते बदल करावे लागतात. आता लेखकाचे नाटकच जर दिवाणखान्यात घडणारे असेल, तर त्याला काय करणार? पण त्यातही काहीतरी नवीन करण्याचा मी प्रयत्न करत असतो.
आत्तापर्यंत तुम्ही घडवलेल्या नेपथ्यांपैकी तुमचे आवडते नेपथ्य कोणत्या नाटकाचे?
मी अनेक नाटकांचे नेपथ्य केले आहे. तरीही एका नाटकाचे केलेले वास्तवदर्शी नेपथ्य माझ्या आजही जसेच्या तसे लक्षात आहे. ‘अमृत मोहिनी’ हे त्या नाटकाचे नाव! त्यात मी कैलास पर्वत उभारला होता. ते माझ्यापुढे आव्हान होते. पण ते नाटक गाजले. सध्या ‘यस माय डिअर’ या नाटकात मी एका कमर्शिअल आर्टिस्टचे घर उभे केले आहे. तेसुद्धा छान जमून आले आहे.
तुमच्या नेपथ्य निर्मितीत दिग्दर्शकाचा किती सहभाग किंवा हस्तक्षेप असतो?
उत्तर - मी नेपथ्य कागदावर मांडत नाही; मी त्याचे थेट मॉडेलच करतो. हे मॉडेल दिग्दर्शकाच्या समोर ठेवतो. ‘मी हे स्क्रिप्टनुसार केले आहे. यात तुम्हाला काही बदल करायचा असेल तर तो तुमचा अधिकार आहे,’ असे मी त्यांना सांगतो. कारण दिग्दर्शकाचा मान त्याला द्यायलाच हवा, असे मी मानतो.
तुमच्या या यशस्वी कारकिर्दीत काही करायचे राहून गेले आहे असे वाटते का?
खरं सांगू का... काही राहिले आहे याचा मी विचार करतच नाही. मला सतत नवनवीन काहीतरी करायचे असते आणि ते माझ्या डोक्यात सुरूच असते. प्रत्येक वर्षी मी नित्यनवीन काहीतरी करतच असतो आणि त्यातच माझा आनंद सामावला आहे.