राज्यात ‘आनंद गुरुकुल’! सुरू करणार ८ निवासी शाळा, शालेय शिक्षण विभागाचा संकल्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 05:40 IST2025-04-17T05:39:19+5:302025-04-17T05:40:18+5:30
Anand Gurukul Residential Schools: आनंद गुरुकुल या निवासी शाळांची पटसंख्या प्रत्येकी २०० विद्यार्थी एवढी असेल.

राज्यात ‘आनंद गुरुकुल’! सुरू करणार ८ निवासी शाळा, शालेय शिक्षण विभागाचा संकल्प
मुंबई : नवीन शैक्षणिक वर्षात राज्यातील प्रत्येक शिक्षण विभागात ९वी ते १२वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ८ आनंद गुरुकुल (विशेष नैपुण्य) निवासी शाळा स्थापन करण्याचा विचार शालेय शिक्षण विभाग करीत आहे. त्यासंदर्भात अहवाल तयार करण्यासाठी अभ्यास गटाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच्या अध्यक्षपदी शिक्षण आयुक्त असतील. अहवाल तत्काळ सादर करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्यासह विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हे या आनंद गुरुकुलाचे उद्दिष्ट आहे.
आनंद गुरुकुल या निवासी शाळांची पटसंख्या प्रत्येकी २०० विद्यार्थी एवढी असेल. या शाळांमध्ये ९वी ते १२वीच्या नियमित शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच २१व्या शतकाची गरज विचारात घेऊन क्रीडा, कला, शास्त्र व तंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जा, संवाद कौशल्य, वित्तीय सेवा, व्यवस्थापन, आरोग्य सेवा, जागतिक पर्यटन, कृत्रिम बुद्धिमत्ता, शाश्वत विकास इत्यादी विषयांच्या विशेष नैपुण्य शाखांचा अभ्यास शिकविण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे.
विद्यार्थ्यांना या विशेष नैपुण्य विषयांचा अभ्यासक्रम शिकविल्यास त्यांना उच्च शिक्षणाची गोडी निर्माण होईल. तसेच देशात उच्च दर्जाचे मनुष्यबळ निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
शासकीय विद्यानिकेतनांचा वापर?
राज्यातील ८ शैक्षणिक विभागांपैकी धुळे, संभाजीनगर, यवतमाळ, सातारा आणि अमरावती या पाच जिल्ह्यांत शासकीय विद्यानिकेतने सुरू आहेत. याव्यतिरिक्त अन्य तीन शैक्षणिक विभागांत शासकीय विद्यानिकेतनाप्रमाणेच सुविधा आणि सुस्थितीत असलेल्या सुयोग्य शाळांची (प्रति विभाग एक शाळा) निवड अभ्यासगट आनंद गुरुकुलसाठी करील.
नैपुण्य शाखांचा अहवाल सादर होणार
क्रीडा, कला, शास्त्र आणि तंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जा, संवाद कौशल्य, भाषण कौशल्य, वित्तीय सेवा, व्यवस्थापन, आरोग्य सेवा, जागतिक पर्यटन, कृत्रिम बुद्धिमत्ता, शाश्वत विकास इ. विशेष नैपुण्य शाखांचा समावेश अभ्यासक्रमात करण्याबाबतचा अहवाल उपसमिती अभ्यास गटाला सादर करेल.
प्रस्तावात काय असेल?
शासकीय विद्यानिकेतनांमधील वर्गखोल्या त्यांचे क्षेत्रफळ, उपलब्ध सुविधा, शाळांच्या जागांचे एकूण क्षेत्रफळ, भौतिक सुविधांची सद्य:स्थिती आणि निवासाच्या सुविधांची माहिती घेऊन या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता आवश्यक अतिरिक्त सुविधा, आवश्यक निधी इत्यादी बाबी विचारात घेऊन अभ्यासगट शासनाला प्रस्ताव सादर करणार आहे.
अभ्यासगट काय करणार?
- आनंद गुरुकुल (विशेष नैपुण्य) निवासी शाळांची स्थळनिश्चिती करणे
- शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विशेष नैपुण्य विषयांचा अभ्यासक्रम तयार करणे
- प्रवेश पद्धती निश्चित करणे, या शाळांची कार्यपद्धती, दिनदर्शिका ठरविणे