"आनंद महिंद्रांचा राज्यातील लॉकडाऊनला विरोध, पण राष्ट्रीय लॉकडाऊनमध्ये थाळ्या पिटण्याचा आनंदही साजरा केला"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 09:12 AM2021-04-04T09:12:47+5:302021-04-04T09:14:40+5:30
शिवसेना नेते संजय राऊतांचा 'रोखठोक' टोला
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्यात लॉकडाऊन लावण्यात येण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. परंतु काही जणांकडून या लॉकडाऊनला विरोध करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनीदेखील या लॉकडाऊनला विरोध दर्शवला होता. दरम्यान, यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांना टोला लगावला. “पंतप्रधान मोदी यांच्या राष्ट्रीय लॉक डाऊन मोहिमेत महिंद्रा सामील झाले होते व त्यांनी थाळ्या पिटण्याचा आनंदही साजरा केला होता,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सदरातून राज्यातील कोरोना परिस्थितीवर भाष्य केलं. तसंच त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. "महाराष्ट्रासह देशाची गती मंदावली असली तरी राजकारणाचा वेग जोरात आहे. तेथे कोरोनाचे भय अजिबात नाही. पश्चिम बंगालात विधानसभेचे तीन टप्पे पार पडले. हजारोंचे रोड शो, लाखोंच्या सभांत कोरोनाचा लवलेशही आढळला नाही. मथुरेत होळी साजरी झाली. त्यात लाखो लोकांनी भाग घेतला. ‘लॉकडाऊन’चे दरवाजे देवाचिया द्वारी तुटून पडले, पण त्यामुळे कोरोना संपूर्ण खतम झाला असे घडले नाही," असं राऊत यांनी नमूद केलं आहे.
कोरोना ही अंधश्रद्धा नाही
कोरोना ही अंधश्रद्धा वगैरे नसून महामारीचे संकट आहे. पंतप्रधान मोदी यांनी लॉक डाऊन काळात लोकांना थाळय़ा व टाळय़ा पिटायला लावले. पण त्यामुळे कोरोना गेला नाही. कोरोनाचा संबंध कोणत्याही जाती-धर्माशी नाही. त्यामुळे घंटा बडवून, अजान देऊनही तो थांबणार नाही. आनंद महिंद्रा यांच्यासारख्या उद्योगपतीने महाराष्ट्रात लॉक डाऊन करण्यास विरोध केला आहे, पण पंतप्रधान मोदी यांच्या राष्ट्रीय लॉक डाऊन मोहिमेत महिंद्रा सामील झाले होते व त्यांनी थाळय़ा पिटण्याचा आनंदही साजरा केला होता; पण पुन्हा लॉक डाऊन नको ही त्यांची भावना चुकीची नसल्याचंही ते म्हणाले.
" पहिल्या लॉक डाऊनला वर्ष झाले. २४ मार्च २०२० च्या संध्याकाळी पंतप्रधान मोदी यांनी अचानक संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केला. त्यानंतर जे घडत गेले ते धक्कादायक आणि अमानुष होते. ‘हिंदुस्थान को बचाने के लिए, हिंदुस्थान के हर नागरिक को बचाने के लिए, आप सभी को बचाने के लिए, आपके परिवार को बचाने के लिए आज रात १२ बजे से घरों से बाहर निकलने पर पुरी तरह से पाबंदी है!’ ही घोषणा मोदींनी करताच संपूर्ण देशात हाहाकार माजला. स्वातंत्र्यानंतरचे सगळय़ात मोठे पलायन हिंदुस्थानने याच काळात पाहिले. देशभरात लोकं अडकून पडले. ऑटो, सायकल, बाईकने, पायी चालत असा प्रवास लोकांनी दोन-दोन हजार किलोमीटर केला. त्या प्रवासात अनेकांनी प्राण सोडले. पुढचे सहा-सात महिने लोकांनी घरातच कोंडून घेतले. कमाईचे साधन बुडाले. रोजगार संपला, पण भीतीने त्या सगळय़ांना घरात कोंडून ठेवले. त्या भीतीची भिंत आता फुटली आहे. ती बांधता येणे कठीण आहे. महाभारताची लढाई १८ दिवस चालली. तुम्ही मला २१ दिवस द्या. २१ दिवसांत कोरोनाला हरवू, असे पंतप्रधान म्हणाले होते. आज एक वर्षानंतरही कोरोनाची लढाई व लॉकडाऊनची भीती कायम आहे. कोरोना हरणार नाही. ममता बॅनर्जी यांना हरवण्यासाठी सरकारने शक्ती पणाला लावली," असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवरही टीकास्त्र डागलं.