आनंद महिंद्रांचं मोठं पाऊल! आता घराघरात पोहोचणार ऑक्सिजन, आणली 'Oxygen on Wheels' योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 12:49 PM2021-05-02T12:49:57+5:302021-05-02T12:53:05+5:30
Anand Mahindra, Oxygen on Wheels:महिंद्रा उद्योगसमुहाचे आनंद महिंद्रा यांनी एक जबरदस्त सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
Anand Mahindra, Oxygen on Wheels: देशात सध्या कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत असून ठिकठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू असल्याच्या घटना समोर येत आहेत. देशाच्या संकट काळात अनेक उद्योगपती, सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंपासून अनेक लोकप्रिय व्यक्ती मदत करत आहेत. त्यात आता महिंद्रा उद्योगसमुहाचे आनंद महिंद्रा यांनी एक जबरदस्त सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. (Anand Mahindra rolls out Oxygen on Wheels in Maharashtra to deal with oxygen crisis)
देशातील अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. यावर तोडगा म्हणून उद्योगपती आनंद महिंदा यांनी ऑक्सिजन ऑन व्हिल्स (Oxygen on Wheels) अशी संकल्पना राबविण्याची घोषणा केली आहे. महिंद्रा कंपन्यांची वाहनं आता हॉस्पीटल्स आणि घरोघरी ऑक्सिजन सेवा पुरविण्यासाठी मदत करणार आहेत. ज्या रुग्णालयांमध्ये किंवा घरोघरी रुग्णाला तात्काळ ऑक्सिजनची गरज भासणार आहे अशा रुग्णांना सेवा देण्यासाठी ही मोबाइल ऑक्सिजन वाहनं उपलब्ध असणार आहेत.
महिंद्रा कंपनीचे ७० बोलेरो पिकअप ट्रक हे ऑक्सिजन सिलिंडर पोहोचविण्याचं काम मोफत करणार असल्याचं आनंद महिंद्रा यांनी जाहीर केलं आहे. आनंद महिंद्रा यांनी याबाबतचं एक ट्विट देखील केलं आहे.
"देशातील कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी मुबलक ऑक्सिजन हीच आता गुरूकिल्ली बनली आहे. ऑक्सिजनच्या निर्मितीची अडचण नाहीय. पण आज ऑक्सिजनच्या वाहतुकीची मोठी समस्या आहे. निमिर्ती केंद्र ते हॉस्पीटल्स आणि घरोघरी ऑक्सिजन पुरवणं यात अडचणी येत आहेत. यामधला दुवा होण्याचं काम आता महिंद्रा ग्रूप होत आहे. 'ऑक्सिजन ऑन व्हिल्स'च्या माध्यमातून ऑक्सिजनची सुरळीत वाहतूक महिंद्रा ग्रूपकडून केली जाणार आहे", असं ट्विट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे.
Today, Oxygen is the key to reducing mortality. The problem is not of oxygen production but its transportation from producing plants to hospitals & homes. We’re attempting to bridge this gap with “Oxygen on Wheels” a project implemented via Mahindra Logistics (1/5) pic.twitter.com/Cj0CkrfYRo
— anand mahindra (@anandmahindra) May 1, 2021
'ऑक्सिजन ऑन व्हिल्स' या संकल्पनेअंतर्गत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि रुग्णालय किंवा रुग्णाचं राहतं ठिकाण या दरम्यानची ऑक्सिजनची वाहतुकीची व्यवस्था महिंद्रा कंपनीच्या वाहनांच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासोबतच आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेला शब्द देखील पूर्ण केला असल्याचं म्हटलं आहे.
Awesome . God bless tou sir .. pls let’s know how we may assist. 🙏🇮🇳 https://t.co/Oc4eiHVn8N
— Ranganathan Madhavan (@ActorMadhavan) May 1, 2021
"मुख्यमंत्री कार्यालयाला मी शब्द दिला होता आणि ४८ तासांतच आमच्या ग्रूपनं पुणे आणि चाकण येथे ऑक्सिजन वाहतुकीची सुविधा सुरू देखील केली. २० बोलेरो वाहनं पुणे आणि चाकण येथे ऑक्सिजन वाहतुकीसाठी कार्यरत आहेत. १३ रुग्णालयांना अत्यावश्यक पातळीवर ६१ जंम्बो ऑक्सिजन सिलिंडर देखील पोहोचवले गेले आहेत. येत्या काळात आणखी मोठ्या पातळीवर महिंद्रा ग्रूपकडून मदत केली जाईल", असंही आनंद महिंद्र यांनी म्हटलं आहे.
अभिनेता आर.माधवन यानंही आनंद महिंद्रा यांच्या कल्पनेचं कौतुक केलं आहे आणि मदत करण्याचीही तयारी दर्शवली आहे.