उल्हासनगरातील आनंद पॅलेस इमारतीला तडे, नागरिकांमध्ये भीती; इमारत केली रिकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 07:56 PM2021-08-01T19:56:36+5:302021-08-01T19:57:01+5:30
कॅम्प नं-५ येथील पाच मजली आनंद पॅलेस इमारतीच्या पिलर्सला तडे गेल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतःहून इमारत खाली केली.
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-५ येथील पाच मजली आनंद पॅलेस इमारतीच्या पिलर्सला तडे गेल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतःहून इमारत खाली केली. महापालिका कर्मचाऱ्यांनी इमारतीची पाहणी करून सविस्तर माहिती वारिष्टना दिल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.
उल्हासनगरात इमारतीचे स्लॅब पडणे, पिलर्सला तडे जाण्याचे सत्र सुरू आहे. तसेच अनाधिकृत व धोकादायक इमारती नियमित करण्यासाठी शासनाने गेल्या आठवड्यात समिती स्थापन केली असून अद्याप निर्णय येण्याचे बाकी आहे. कॅम्प नं-५ देवसमाज मंदिरा जवळील ५ मजल्याच्या आनंद पॅलेस इमारतीच्या पिलर्सला तडे गेल्याचे रविवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान उघड झाले. इमारतीची दुरुस्ती गेल्या महिन्यात केल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र शेजारील इमारत बांधण्याचे काम सुरू असल्याने, आनंद पॅलेस इमारतीला तडे गेल्याचे बोलले जाते. या इमारती मध्ये एकून १६ कुटुंब राहत असून तळमजल्यावर दोन दुकाने आहेत. इमारतीच्या पिलर्सला तडे जाऊन घराचे दरवाजे उघडेनाशे झाल्याने, इमारतीधारकात भीतीचे वातावरण निर्माण झाले. इमारत पडेल या भितीने नागरिकांनी इमारत खाली केली असून महापालिका अधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणी केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली.
महापालिका सभागृहनेते व स्थानिक नगरसेवक भारत गंगोत्री यांनी इमारतीची पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला. बेघर झालेल्या नागरिकांनी मोजक्या साहित्यासह नातेवाईकांच्या घरी आश्रय घेतला. सोमवारी महापालिका इमारती बाबत काय कारवाई करते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.