‘आनंदवन सर्वात वाईट जागा!’
By admin | Published: October 19, 2015 02:19 AM2015-10-19T02:19:42+5:302015-10-19T02:19:42+5:30
समाजात मानाने जगता यावे, म्हणून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी सुरू केलेले आनंदवन हे प्रेमाचे अभयारण्य आहे
मुंबई : समाजात मानाने जगता यावे, म्हणून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी सुरू केलेले आनंदवन हे प्रेमाचे अभयारण्य आहे. प्रत्यक्षात ही जगातील सर्वात वाईट जागा असून, कुष्ठरोगाचे निर्मूलन करून ती बंद करणे, हेच आमचे ध्येय असल्याचे उद्गार महारोगी सेवा समिती वरोरा आनंदवनाचे सचिव डॉ. प्रकाश आमटे यांनी काढले. ते मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त
अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधताना बोलत होते.
डॉ. विकास आमटे म्हणाले की, ‘बाबा कुष्ठरोग्यांना समाजात पुन्हा मानाने कसे पाठवता येईल, याचा विचार करायचे. त्यासाठीच बाबा कुष्ठरोग्यांना सामाजिक भूकंप म्हणायचे. समाजाने कुष्ठरोग्यांना पूर्णपणे झिडकारल्याने महारोगी म्हणजे, दलितातील दलित व पीडितातील पीडित माणूस झाला होता. रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदार ओळखपत्र असा कोणताही पुरावा त्यांना मिळत नव्हता. म्हणजेच समाजाप्रमाणेच सरकारनेही त्यांना नाकारल्याची भावना निर्माण झाली होती. म्हणूनच आनंदवन हा एक स्वेच्छा तुरूंग वाटत असून, मी त्याचा जेलर असल्याचे वाटतो.’
आनंदवनबद्दल सांगताना आमटे यांनी त्याचा उल्लेख एक प्रयोगशाळा म्हणून केला. १९३७ साली सुरू केलेल्या या प्रयोगापासून आत्तापर्यंत ६५ वर्षांत सुमारे २३ लाख कुष्ठरोगी आणि पीडित लोकांना मदत झाली आहे आणि याच लोकांच्या मदतीतून अंध आणि अपंगांसाठी २८ प्रकल्प आनंदवनने सुरू केले आहेत. मात्र, हे काम करताना सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत मिळत नसताना कर लादले जात असल्याची खंत आमटे यांनी व्यक्त केली.
गॅसचे अनुदान बंद केल्याने आनंदवनची आर्थिक गणित बदलल्याचेही त्यांनी सांगितले. आनंदवनात एकच रेशनकार्ड असल्याने हा परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, समाजातील अनेक लोकांनी मदत केल्याने निभावल्याचे ते म्हणाले. येथील सर्वात मोठा सार्वजनिक बायोगॅस प्रकल्प सुरू झाल्याने आनंदवन एलपीजी विरहित झाल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि आयडॉलच्या प्रभारी संचालिका डॉ. अंबुजा साळगांवकर आणि आयडॉलचे एम.ए. अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते.