आनंदवन कायम विस्मरणात

By admin | Published: November 11, 2016 02:14 AM2016-11-11T02:14:20+5:302016-11-11T02:14:20+5:30

बाबांच्या स्वप्नांना अनुसरून आनंदवनतर्फे पहिली ग्रंथदिंडी काढण्यात आली. सुुरुवातीला या उपक्रमाची थट्टा करण्यात आली.

Anandvan always forgotten | आनंदवन कायम विस्मरणात

आनंदवन कायम विस्मरणात

Next

पुणे : बाबांच्या स्वप्नांना अनुसरून आनंदवनतर्फे पहिली ग्रंथदिंडी काढण्यात आली. सुुरुवातीला या उपक्रमाची थट्टा करण्यात आली. त्यानंतर मराठी साहित्य संमेलनांमध्ये आवर्जून ग्रंथदिंडीच्या उपक्रमाची नक्कल करण्यात आली; मात्र, आनंदवनाचे स्मरण ठेवण्यात येत नाही, अशी खंत आनंदवनचे प्रमुख डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केली.
अक्षरधारा आणि राजहंस प्रकाशनतर्फे आयोजित ‘दीपावली शब्दोत्सव’निमित्त पुस्तकदान महोत्सवात डॉ. आमटे यांनी गुरुवारी वाचकांशी संवाद साधला. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद कुलकर्णी, मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे, कार्यवाह अनिल कुलकर्णी, नृसिंह मांडके, डॉ. प्रदीप लोखंडे उपस्थित होते.
आमटे म्हणाले, ‘‘पु. ल. देशपांडे, विश्राम बेडेकर, गो. नी. दांडेकर, आचार्य अत्रे अशा दिग्गजांनी आनंदवनावर भरभरुन प्रेम केले आणि आम्हाला उभारी दिली. आनंदवनाला या सारस्वतांच्या मांदियाळीने नियमित भेट दिली. मराठी माणसाची मानसिकता बदलण्याचे मोठे काम यांनी केले. त्यामुळेच मी लेखन वाचले नाही; मात्र, माणसे वाचली. साहित्याच्या या अद्भूत दुनियेत सफर करण्यासाठी मला वाचक म्हणून पुनर्जन्म मिळावा, हीच इच्छा आहे.’’
आनंदवनाविषयी ते म्हणाले, ‘‘आनंदवनातील लोकांनी उणिवांवर मात करत जीवनात भरभरुन यश मिळवले. देशातला सर्वात मोठा बायोगॅस प्रकल्प येथे उभा राहिला आहे. थेराप्युटिक थेरपीचा प्रयोग येथे यशस्वी होत आहे. दुर्दम्य आशावादाच्या बळावर येथील लोक जीवन आनंददायी करत आहेत. आनंदवनात अनेक जण अंथरुणाला खिळलेले आहेत. त्यांनाही वाचनाची ऊर्मी आहे.
मात्र, वाचन करणे शक्य होत नाही. गो. नी. दांडेकर यांनी त्यांच्यासाठी वाचन करण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला होता. मात्र, त्यांची गादी पुढे कोणीही चालवली नाही.’’
पुस्तकदान उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी सुमारे ५००० पुस्तके भेट म्हणून देण्यात आली. डॉ. प्रदीप लोखंडे यांनी ‘ग्यान की चळवळ’ या उपक्रमाची माहिती दिली. विश्वास मेहेंदळे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Anandvan always forgotten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.