‘कोरे’गाव ठरले प्राचीन ‘अक्षर’गाव!
By admin | Published: June 28, 2015 10:54 PM2015-06-28T22:54:30+5:302015-06-29T00:38:30+5:30
‘लोकमत’ ठरला साक्षीदार : केदारेश्वर मंदिर परिसरातील इतिहास संशोधन रोचक टप्प्यावर
सातारा : ‘गोवत्स’ आणि ‘गधेगाळ’ ही दोन चिन्हे कोरेगावातील एकाच शिलालेखावर आढळल्याने इतिहासाने वेगळेच वळण घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, ‘गधेगाळ’ मूळ शिलालेखावर नंतर कोरण्यात आली आहे. कायदा कडक करणे, सामाजिक उलथापालथ किंवा राजसत्तेतील बदल यापैकी काहीतरी दहाव्या शतकात घडले होते, असे हा शिलालेख सूचित करतो.
साताऱ्याच्या जिज्ञासा इतिहास संशोधन संस्थेने डिसेंबर २०१४ पासून कोरेगावातील केदारेश्वर मंदिर परिसरातील शिल्पांचे संशोधन सुरू केले. ते आता रोचक वळणावर आले असून, या प्रवासाचा ‘लोकमत’ साक्षीदार आहे. ‘बाराशे वर्षांपासून नांदतेय कोरेगाव’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’ने २३ मार्चच्या अंकात सचित्र वृत्तांत प्रसिद्ध केला होता.
जमिनीत निम्मा गाडलेला शिलालेख कोरेगाव ग्रामपंचायतीच्या परवानगीने मोकळा केल्यानंतर अद्भुत दृश्य दिसले. गोवत्स आणि गधेगाळ ही चिन्हे एकाच शिलालेखावर दिसली. या दोन्ही ‘चित्ररूपी आज्ञा’ असून, एक सौम्य तर दुसरी प्रखर आहे. सौम्य आज्ञेचे पालन होत नसल्याचे दिसल्यानंतर प्रखर आज्ञा कोरली
गेली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
हा शिलालेख साधारण चार फूट उंच आणि पावणेदोन फूट रुंदीचा असून, त्याच्या वरील भागावर चंद्र-सूर्य कोरले आहेत. राजाचे साम्राज्य
चंद्र-सूर्य असेपर्यंत राहील असा याचा अर्थ. त्याखाली शिवलिंग, खड्ग आणि गोवत्स म्हणजे गायवासरू आहेत.
राजा शिवउपासक आहे, असा शिवलिंगाचा अर्थ. त्याने ही जमीन देवाला दान केली असल्याचे गायवासरू हे निदर्शक आहे. या संशोधनातून कोरेगावचा बाराशे वर्षांचा इतिहास उलगडू लागला होता. परंतु शिलालेख अर्धा जमिनीत असल्याने त्यावरील ओळी वाचता येत नव्हत्या.
शिलालेख जमिनीतून मोकळा केल्यानंतरही जीर्ण अक्षरे वाचता येत नव्हत्या; परंतु सागर गायकवाड यांनी अभिनव युक्ती वापरली आणि अक्षरे दिसू लागली.
अक्षराच्या वळणावरून हा दहाव्या शतकातील संस्कृतमिश्रित मराठी लेख असल्याचे स्पष्ट होत असल्याने मराठी आणि कोरेगाव दोहोंच्या दृष्टीने ही सुवार्ता ठरली आहे. (प्रतिनिधी)
‘गधेगाळ’ म्हणजे काय...
सामान्यत: ‘गधेगाळ’ किंवा ‘गद्धेगाळ’ म्हणजे एक शापवाणी किंवा चित्ररूपी अपशब्द होय. एखादी राजाज्ञा किंवा दानपत्रातील गोष्टींचा जो गैरवापर करेल, तो गाढव योनीत जन्माला येऊन आपल्या आईशी रत होईल, अशा अर्थाची ही शापवाणी होय. ती लिखित स्वरूपात क्वचित आढळते. अशिक्षित व्यक्तीलाही राजाज्ञेचे गांभीर्य लक्षात यावे म्हणून या शापवाणीचे शिल्पांकनच आढळते. यात गाढव आणि स्त्रीचा समागम चित्रित केलेला असतो. सातारच्या संग्रहालयातही एक अरबी भाषेतील गधेगाळ आहे. त्यावर ‘अल होमार’ म्हणजेच ‘गाढवाचा लेक’ अशी अक्षरे कोरली आहेत. ‘जिज्ञासा’चे विक्रांत मंडपे तिचा अभ्यास करीत आहेत.
इतिहास
काय सांगतो
शिलाहार घराण्याने सातारा-कोल्हापूर प्रांतात असंख्य किल्ले बांधले. विशाळगड, अजिंंक्यतारा, चंदन-वंदन, रोहिडा, वैराटगड, पांडवगड, केंजळगड, कमळगड, सज्जनगड असे दुर्ग शिलाहारांनी बांधले. गंडरादित्याने खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर बांधायला सुरुवात केली. या मंदिराच्या कामात जवळजवळ दोन पिढ्या खर्ची पडल्या. कोपेश्वराबरोबरच गंडरादित्याने हिंदू मंदिरांबरोबरच जैन आणि बुद्ध मंदिरेही बांधली. गंडरादित्याची पत्नी कर्णावती जैन धर्माचे आचरण करणारी होती. कोल्हापूर-सातारा जिल्ह्यांतील प्रदेशांवर राज्य करणारे शिलाहार आपले वर्णन ‘तगरपुरवराधीश्वर’ असे करीत. त्यावरून ते तगरनगरातून आले होते, हे स्पष्ट होते. हे तगर म्हणजे मराठवाड्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील ‘तेर’ होय.
नाव एक, कहाण्या दोन
संपूर्ण कोकणासह दक्षिण महाराष्ट्रात राज्य करणारे हे राजे स्वत:ला विद्याधर राजपुत्र जीमूतवाहनाचा वंशज मानत. प्राचीन दंतकथेनुसार जीमूतवाहनाने शंखचूड नावाच्या नागाला गरुडाच्या पंजातून सोडविण्यासाठी स्वत:च्या प्राणांचे बलिदान दिले होते. या प्रसंगापासूनच त्यांच्या कुळाला शिलाहार (शिला-आहार) असे नाव पडल्याचे मानले जाते.
प्रिन्स आॅफ वेल्स संग्रहालयात असलेल्या शिलाहार राजा छद्वैदेवाच्या ताम्रपटात ‘सिलार’ नावाच्या पराक्रमी वीराने परशुरामाच्या बाणापासून संत्रस्त झालेल्या समुद्राचे रक्षण केले, असा उल्लेख आहे. याच सिलाराच्या कुळाला पुढे सिलारा-सिलाहारा-शैलाहार-शिलाहार असे म्हटले गेले, असाही एक मतप्रवाह आहे.
कोण होते शिलाहार...
शिवकाळाच्या सहाशे वर्षे आधीच उदयाला आलेली एक महासत्ता म्हणजे शिलाहार होत
शिलाहार राजांनी प्रामुख्याने राष्ट्रकूट आणि चालुक्यांचे मांडलिक म्हणून काम पाहिले असले तरी त्यांची राजवट प्रबळ होती. मांडलिकत्व केवळ नामधारी होते
हे राजे स्वत:ला महामंडलेश्वर, कोकणाधीश, कोकणचक्रवर्ती, राजाधिराज अशी बिरुदे लावीत असत
कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर बांधणारा गंडरादित्य हाही शिलाहार राजा होय
अंधश्रद्धांना विरोध करणारा गंडरादित्य स्वत:ला ‘शनिवारसिद्ध’ म्हणजेच घातवारी हाती घेतलेले कामही सिद्धीस नेणारा, असे बिरुद लावीत असे
दक्षिणेकडील अत्यंत शूर आणि दिग्विजयी अशा चोला राजांचा पराभव शिलाहार राजांनी खिद्रापूर येथे केला होता
शिवरायांना अत्यंत उपयुक्त ठरलेल्या गिरिदुर्गांचा निर्माता म्हणून राजा भोज द्वितीय याचा उल्लेख होतो.