मेथी गावातील पुरातन नागरशैली मंदिरे देतात यादव काळाची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 05:54 AM2023-07-14T05:54:04+5:302023-07-14T05:54:48+5:30
गावात एकाच पद्धतीची चार मंदिरे: १० ते १३ व्या शतकादरम्यान उभारल्याचा अंदाज
भिका पाटील
शिंदखेडा - गावोगावी विविध देवदेवतांची मंदिरे असतात. काही गावांमध्ये हेमाडपंथीय मंदिरे आहेत. मात्र, त्यांची संख्याही अत्यंत कमी असते. परंतु, शिंदखेडा तालुक्यातील अवघ्या साडेसात ते आठ हजार लोकसंख्या असलेल्या मेथी या गावात नागरशैली पद्धतीची एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल चार मंदिरे आहेत. एका छोट्या गावात एकाच पद्धतीची मंदिरे असणे हे विशेष असून, आजही ही मंदिरे तत्कालीन वास्तुरचनेची साक्ष देत आहेत.
देशात पुरी येथील जगन्नाथ मंदिर, कोनार्व येथील कोनार्व मंदिर (ओडिशा), सोमनाथ मंदिर (गुजरात) ही मंदिरे नागरशैलीची मंदिरे आहेत. आकाशाकडे झेपावणारी, उंच पद्धतीची अशी या मंदिराची रचना असते. अगदी त्याच पद्धतीने मेथी गावातही नागरशैलीची मंदिरे आहेत. या गावाच्या पूर्वेला भवानी व बालाजी, पश्चिमेला विष्णू आणि हरिया ही मंदिरे आहेत. मेथी येथे यादवकाळात म्हणजे १० ते १३ व्या शतकादरम्यान ही मंदिरे बांधण्यात आलेली असल्याचे जाणकार सांगतात. बालाजी मंदिरास बालाजी मंदिर म्हणून ओळखतात. मात्र, काही तज्ज्ञांच्या मते नारायण, अनंतशयन वगैरे नावानेही संबोधले आहे.
गर्भगृहाच्या द्वारशाळेतील वैष्णव द्वारपालावरून आणि आडव्या प्रस्तावावरून गरुडाच्या शिल्पावरून हे विष्णू मंदिर आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. साधारणत: १२ फूट उंच अशा मजबूत जोत्यावर ते अधिष्ठित आहेत. सात ते आठ पायऱ्या चढून जावे लागते. पायऱ्या मंदिराच्या पूर्वेकडे व दक्षिणेकडे आहेत. मुख्य मंडप व उपमंडप किंवा कठड्यांनी सुरक्षित व सुशोभित आहे. बालाजी मंदिरास लागूनच भवानी मंदिर आहे. मंदिराचे पूर्वेकडे तोंड आहे. गर्भगृह अंतराळ, गूढमंडप आणि मुखमंडप आहे. ते ११ फूट उंच अशा जोत्यावर अधिष्ठित आहे. येथील दगडावरील कोरीव काम नजरेत भरण्यासारखे आहे.
अशी आहे रचना
हरिया मंदिर गावाच्या दक्षिणेस नदीच्या पलीकडे आहे. स्थानिक लोकांना हरिया म्हणून परिचित असलेले विष्णूचे मंदिर जगतीवर अधिष्ठित आहे. मंदिराची रचना गर्भगृह, मंडप, अंतराळ, उपगर्भगृहे, मुखमंडप आणि समोरच गरुड मंडप अशी आहे. मंदिर पश्चिमाभिमुख आहे. विष्णू मंदिर मध्यभागी बारव आणि सभोवताली फक्त गर्भगृह असलेली छोटी छोटी एका खोलीची ही मंदिरे आहेत. मंदिरास पूर्व दिशेने प्रवेश आहे. पूर्वी येथे मोठमोठी झुडपे होती. साफसफाई करून मंदिराचा ओटा मोकळा केला आहे. यादव काळात मेथी हे वैष्णव धर्मियांचे श्रद्धास्थान होते. तसेच यादव राजा कृष्ण याचा राजाश्रय मेथीच्या मंदिर निर्मितीस लाभला, असे जाणकारांचे म्हणणे आहे. केवळ मेथीयेथेच सुंदर मूर्ती पाहावयास मिळतात.