वेसावकरांची अणुकुचीदार भाल्याने हंडी फोडण्याची पुरातन परंपरा
By Admin | Published: August 24, 2016 09:33 PM2016-08-24T21:33:01+5:302016-08-24T21:33:01+5:30
मासेमारी केरळ नंतर वेसावे कोळीवाड्याचा दुसरा क्रमांक लागतो.मुंबईत काँस्मोपाँलिटीयन संस्कृतीत आणि आज गगनचुंबी इमारती मोठ्या प्रमाणत उभ्या राहिल्या असतांना
मनोहर कुंभेजकर
मुंबई, दि. 24 - मासेमारी केरळ नंतर वेसावे कोळीवाड्याचा दुसरा क्रमांक लागतो.मुंबईत काँस्मोपाँलिटीयन संस्कृतीत आणि आज गगनचुंबी इमारती मोठ्या प्रमाणत उभ्या राहिल्या असतांना आज मुंबईचा मूळ नागरिक असलेल्या वेसावे कोळीवाड्याने आपली परंपरा आणि संस्कृती कायम ठेवली आहे.गेल्या १००वर्षापासून वेसावे कोळी जमात पब्लिक रिलीजियस अँन्ड चँरिटेबल ट्रस्टच्यावतीने वेसावे कोळीवाड्यातील साजरे होणारे विविध सण आणि उत्सवाचे नियोजन केले जाते.
यंदा उद्याच्या दहीहंडीचा मान नऊ वर्षांनी वेसावा कोळी जमात रिलीजियस अँन्ड चँरिटेबल ट्रस्टला मिळाला आहे.या ट्रस्टचे अध्यक्ष मनीष भुनगवले यांना यंदाचा दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला आहे.मुंबई आणि राज्यात सर्वत्र मनोरे रचून हंडी फोडण्याची परंपरा असतांना मात्र याला अपवाद वेसावे कोळीवाडा आहे.येथील राम मंदिर परिसरात अणुकुचीदार भाल्याने हंडी फोडण्याची वेसावकरांची पुरातन परंपरा आहे.
वेसावे कोळीवाड्याची भोगोलिक परिस्थिती लक्षात घेता वेसावे कोळीवाड्यात डोंगरी गल्ली,मांडवी गल्ली,बाजार गल्ली,गोमा गल्ली,पाटील गल्ली,बुधा गल्ली,तेरे गल्ली,शिवगल्ली व कास्कर बंधू असे एकूण ९ पाडे( गल्या) आहेत.दरवर्षी प्रत्येक विभागाला येथील हंडी फोडण्याचा मान दिला जातो.दर नऊ वर्षानी हा मान एका गल्लीला मिळतो.
पावसाळी मासेमारी संपल्यानंतर मोठ्या कष्ठाने नव्या मासेमारीची सुरवात आपल्या बोटीना रंगरंगोटी-डागडुजी करून येथील कोळी बांधव मासेमारीसाठी सज्ज होतात.नारळी पौर्णीमेला सुमुद्राला नारळ अर्पण केल्या नंतर दुसऱ्या दिवशी येथील श्री शंकर आणि श्री राम मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाला सुरवात होते.गावातील गल्यांच्या विविध मंडळांना अखंड हरिनाम सप्ताहात आळीपाळीने सहभागी होण्याचा मान दिला जातो.ज्या गल्लीला हंडी फोडण्याचा मान आहे ती गल्ली दहीहंडी उत्सवाचे सर्व नियोजन करते.
ज्या गल्लीला हंडी फोडण्याचा मान असतो त्या गल्लीतील सर्व स्त्रिया-पुरूष आणि लहान मुले यांच्यासाठी खास गणवेश तयार केला जातो.यंदा वेसावा कोळी जमात ट्रस्टच्या सर्व विश्वस्त आणि सभासद आणि हितचिंतकासाठी निळ्या रंगाचा गणवेश तयार करण्यात आला आहे अशी माहिती ट्रस्टचे मानद सचिव जयंत भावे आणि खजिनदार शांताराम धाको यांनी दिली.
पौराणिक देखावे चलचित्रद्वारे मिरवणुकीत सादर करून दहीहंडी वाजतगाजत येथील श्रीराम मंदिरात नेली जाते.नेत्रदीपक अश्या या दहीहंडी मिरवणुकीला संपूर्ण वेसावे गाव लोटला असतो.श्रीराम मंदिर परिसरात दहीहंडी बांधली जाते.त्याचबरोबर अणकुचीदार भाल्याची पूजा केली जाते.नंतर ज्या गल्लीला हंडी फोडण्याचा मान आहे त्यागल्लीचा अध्यक्ष येथील मानाची हंडी फोडतो.यंदाची हंडी फोडण्याचा मान वेसावा कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष मनीष भुनगवले यांना मिळाला आहे.त्यानंतर गावतील अन्य गाल्यांच्या हंड्या देखिल मिरवणुकीने आणि वाजतगाजत या जमातीतर्फे यंदा फोडण्यात येणार आहेत.गावातील सर्व हंड्या फोडल्यावर वाजत-गाजत भाला झ्रकाठी अभंगाच्या गजरात मंदिरात आणली जाते.आणि मग भगवंताची आरती झाल्यावर या उत्सवाची यशस्वी सांगता होते.