...आणि १२८ जणांचे वाचले प्राण
By Admin | Published: March 5, 2016 02:29 AM2016-03-05T02:29:35+5:302016-03-05T02:29:35+5:30
१२0 प्रवासी, आठ क्रू मेंबर्स या सर्वांना घेऊन विमान उतरत असतानाच अचानक टायर फुटून झालेला अपघात आणि त्याचवेळी प्रसंगावधान राखून वैमानिकाने उतरविलेले विमान
मुंबई : १२0 प्रवासी, आठ क्रू मेंबर्स या सर्वांना घेऊन विमान उतरत असतानाच अचानक टायर फुटून झालेला अपघात आणि त्याचवेळी प्रसंगावधान राखून वैमानिकाने उतरविलेले विमान... ही घटना एखाद्या हिंदी चित्रपट किंवा हॉलीवूड चित्रपटाला शोभेल अशीच आहे. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेत
सुदैवाने मात्र कोणीही जखमी झालेले नाही.
विमानतळावर जेट एअरवेजचे विमान उतरत असताना गिअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, वैमानिकाच्या प्रसंगावधानाने विमान सुरक्षित उतरले. दुर्घटना टळल्याने १२० प्रवासी आणि ८ कर्मचाऱ्यांचे प्राण बचावले.
जेट एअरवेजचे ‘९ डब्ल्यू ३५४’ विमान दिल्लीहून मुंबईला आले. यामध्ये एकूण १२८ प्रवासी प्रवास करत होते. मुंबई विमानतळावर हे विमान लँड करत असताना अचानक या विमानाचा टायर फुटला. यात विमानाचे गिअर अचानक तुटल्यानेच अपघात झाला. मात्र वैमानिकाने प्रसंगावधान राखून विमान व्यवस्थितरीत्या विमानतळावर उतरविले. त्यामुळे अपघात टळला आणि सगळ्यांचे प्राण वाचले. त्यानंतर दहा तासांच्या रिकव्हरी आॅपरेशननंतर बिघडलेले विमान जेट एअरवेजच्या हँगरमध्ये हलविण्यात आल्याची माहिती जेट एअरवेजच्या प्रवक्त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली.
घटनेनंतर मुख्य धावपट्टी बंद करून पर्यायी रनवेवर विमान उतरवण्यात येत होते. या घटनेचा विमानसेवेवर थेट परिणाम झाल्याने बराच वेळ विमानांना उड्डाणासाठी उशीर झाला तर काही विमाने अहमदाबादकडे वळवण्यात आली होती. दुपारनंतर विमानसेवा पूर्ववत झाली. (प्रतिनिधी)