आणि हातकडीसह पळाला आरोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2016 07:45 PM2016-08-23T19:45:15+5:302016-08-23T19:45:15+5:30
लोहमार्ग पोलिसांच्या हातावर तुरी देत हातकडीसह आरोपी पळून गेल्याची घटना सोमवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर घडली.
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. २३ : लोहमार्ग पोलिसांच्या हातावर तुरी देत हातकडीसह आरोपी पळून गेल्याची घटना सोमवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर घडली. फरार आरोपीचा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी,कर्मचारी रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी दिवसभर शहरात शोध घेत होते. शिवाय एक पथक मनमाडला रवाना पाठविण्यात आले.
अमोल उर्फ सोनू चंडालिया (२०) रा.मनमाड असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. याविषयी लोहमार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मनमाड येथील एका गुन्हाप्रकरणी तो नाशिक कारागृहात होता. एका प्रकरणामध्ये त्याचे नाव समोर आल्याने चौकशी करण्यासाठी लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलीस हवलादार धनराज गंडलिंगे आणि पोलीस कॉन्स्टेबल साहेबराव वाघ हे त्यास सोमवारी जनशताब्दी एक्स्प्रेसने औरंगाबादला आणत होते.
यावेळी त्यास हातकडी आणि दोरी बांधण्यात आली होती. रात्री ८.३० वाजेच्या सुमारास जनशताब्दी एक्स्प्रेस रेल्वेस्टेशनवर दाखल झाली. रेल्वे थांबताच अचानक त्याने जोराने झटका मारली. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातातून दोरी निसटली. त्यामुळी ही संधी मिळताच रेल्वे रुळाच्या मार्गाने तो उस्मानपुऱ्याच्या दिशेने पळून गेला.मंगळवारी दिवसभर आरोपीचा शोध सुरू होता.