...तर चौघुले यांनाही अटक करा
By admin | Published: May 18, 2016 02:32 AM2016-05-18T02:32:04+5:302016-05-18T02:32:04+5:30
भाजपा आमदार महेश चौघुले यांच्या समर्थकांकडून झालेल्या मारहाणीत रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता विकी ढेपे याचा मृत्यू झाला.
वज्रेश्वरी : भाजपा आमदार महेश चौघुले यांच्या समर्थकांकडून झालेल्या मारहाणीत रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता विकी ढेपे याचा मृत्यू झाला. या घटनेत चौघुले दोषी असल्यास त्यांना अटक करावी अशी मागणी रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. तसेच विकीच्या बहिणीला भिवंडी पालिकेत नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
विकीच्या घरी जाऊन आठवले यांनी त्याच्या कुटुंबाचे सांत्वन केले. दरम्यान, विकीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सरकारकडून मदत मिळण्यासाठी प्रयत्न करीन असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या हत्येची सीआयडी चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. या हत्येला कुणीही राजकीय रंग देऊ नये असेही त्यांनी नमूद केले. दलितांवर झालेला हल्ला आहे यादृष्टीने तपास करावा अशी विनंती पोलिसांना केल्याचे त्यांनी सांगितले.
विकीच्या हत्येनंतर भिवंडीत तणावाचे वातावरण होते. चौघुले यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती. हत्येच्या निषेधार्थ सोमवारी मोर्चाही काढला होता. वऱ्हाळनगर येथून अंत्ययात्रा निघाली. रिपाइंचे शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड, प्रा. सुमित्र कांबळे, गुणवंत शिंदे ,अनिल गायकवाड , बालाजी कांबळे सहभागी झाले होते. कामतघर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले .
दरम्यान, आठवले यांच्या सूचनेनुसार शहर उपाध्यक्ष रवी गुज्जा यांनी एक लाखाची मदत विकीच्या कुटुंबासाठी देण्याचे जाहीर केले. (वार्ताहर)