...अन् पुरात अडकलेल्या बसमधील प्रवाशांची सुटका!
By admin | Published: August 12, 2016 04:39 AM2016-08-12T04:39:55+5:302016-08-12T04:39:55+5:30
नदीच्या फरशीवरून पुराचे पाणी वाहत असतानाही मोठ्या पुलावरून बस न घेता बेजबाबदारपणे फरशीवरून बस नेताना ती पुरात अडकली
नवापूर (जि. नंदुरबार) : नदीच्या फरशीवरून पुराचे पाणी वाहत असतानाही मोठ्या पुलावरून बस न घेता बेजबाबदारपणे फरशीवरून बस नेताना ती पुरात अडकली. त्यातच बस बंद पडल्यानंतर पाण्याचा वेग वाढला. मात्र वाहकाने सावधानता दाखवित तातडीने १०० क्रमांकावर फोन केला आणि पोलीस पथक मदतीला धावले. त्यामुळे १८ प्रवाशांची सुटका झाली. नवापूरमधील रंगावली नदीच्या पुरात हा थरार गुरुवारी सकाळी सुरू होता.
वाहकाच्या प्रसंगावधानामुळे महाडच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती येथे टळली. बेजबाबदार बसचालक राकेश साबळे यास निलंबित करण्यात आले असून संध्याकाळी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. जालना आगाराच्या जालना- सूरत एस.टी. बसने पहाटे पाच वाजेच्या सुमारास नवापूर बसस्थानक सोडले़ नवापूरमधील रंगावली नदीच्या फरशीवरून पाणी वाहत असल्याने वाहक कैलास धनराज पाटील यांनी साबळे यास बस फरशीवरून नेवू नका, असे असे बजावले. मात्र अतिविश्वासात साबळेने बस पुढे घेतली, तेव्हा फरशीच्या मधोमध पुराच्या पाण्यात ती अडकली़ बसच्या सायलेंसरमध्ये पाणी गेल्याने ती बंद पडली़ खिडक्यांपर्यंत पुराचे पाणी आले होते. घाबरलेल्या प्रवाशांनी आरडाओरड करण्यात सुरुवात केली. पाटील यांनी प्रसंगावधान राखून मदतीसाठी पोलिसांच्या १०० क्रमांकावर, तसेच एसटीच्या अधिकाऱ्यांना घटनेची खबर दिली़ रात्री गस्तीवर असलेले सहायक पोलीस निरीक्षक दिलीप बुवा यांना माजी नगरसेवक सोहेल बलेसरिया व रमेशचंद्र राणा यांनीही खबर दिली़ पोलीस व जागरूक नागरिकांनी नदीपात्राकडे तातडीने धाव घेतली़ जेसीबी मागवून लोखंडी केबलने बस रोखून धरण्यात आली. लोकांनी चालक-वाहकासह सर्व १८ प्रवाशांना अवघ्या काही मिनिटांत सुखरुप बाहेर काढले़
बसमध्ये अरुण जनसिंग राठोड, योगिता अरुण राठोड (दोन्ही रा़ जळगाव), शोभा देवीदास पवार, देवीदास व्यंकट पवार (दोन्ही़ रा पंढरपूर), रशीद बाबमिया अन्नार
(रा़ जालना), एकनाथ महादेव गमे
व मजहरखान फैजुल्ला पठाण
(दोन्ही राग़ेवराई), पिंटू भावजी चौहान, राजेश मोहन परमार (दोन्ही
रा़ भावनगर, गुजरात), रामदास विश्वनाथ तेलंग (रा़उमरगा), भास्कर राजाराम नवेरे (रा़ चाळीसगाव), प्रवीणचंद्र कांतीलाल नगारिया
(रा़ जाफराबाद), जाकीरशा शब्बीरशा पठाण (रा़ खंडवा), रेगाधीश रोहित बंदुकिया (रा़ जालना) यांना तातडीने बाहेर काढण्यात
आले. (प्रतिनिधी)