...अन् घराची लॉटरी लागली
By Admin | Published: February 25, 2016 02:52 AM2016-02-25T02:52:43+5:302016-02-25T02:52:43+5:30
म्हाडाच्या कोकण मंडळातील विरार, ठाणे, मीरारोड आणि वेंगुर्ला येथील ४ हजार २७५ घरांची सोडत बुधवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडली. या वेळी अनेकांची घरांची वणवण
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळातील विरार, ठाणे, मीरारोड आणि वेंगुर्ला येथील ४ हजार २७५ घरांची सोडत बुधवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडली. या वेळी अनेकांची घरांची वणवण थांबली असली, तरी अनेक अर्जदार नव्या स्वप्नांची गुंफण करण्यासाठी पुन्हा प्रयत्न इराद्याने सभागृहातून निघाले. त्या वेळी कोणाच्या चेहऱ्यावर हसू, तर काहींच्या चेहऱ्यावर आसू असे चित्र निर्माण झाले होते.
आश्चर्याची बाब म्हणजे, सभागृहात उपस्थितांपैकी एकाही व्यक्तीला पहिल्या तासाभरात निघालेल्या सोडतीमध्ये घर लागले नव्हते. मात्र, त्यानंतर काढलेल्या मीरारोड येथील सोडतीमध्ये संतोष कांबळे (२७) आणि इक्बाल खान (२५) या सभागृहात उपस्थित तरुणांची नावे जाहीर झाली. या दोन्ही तरुणांनी स्वत:च्या नावाने प्रथमच अर्ज केला होता.
या आधी मंगळवारी रात्रीपासूनच घरांसाठी अर्ज केलेल्या अर्जदारांनी रंगशारदा सभागृहाबाहेर मुक्काम ठोकला होता. त्यामुळे सकाळी आलेल्या अर्जदारांची त्यात भर पडल्याने, रांग सुमारे दोन किलोमीटर दूरवर गेली होती. स्थानिक पोलिसांमार्फत आॅनलाइन लॉटरी पाहण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत होते. मात्र, घराच्या आशेपोटी आलेले अर्जदार सभागृहाबाहेरील मंडपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते.
वणवण थांबली...!
माझा सोडतीवर विश्वास नव्हता. अनेकांनी सोडतीमध्ये गैरव्यवहार होत असल्याचे सांगितले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून अर्ज भरला. घर लागेल, अशी आशाही नव्हती. मात्र, नशिबाने साथ दिली आणि घर लागले. त्यामुळे सोडतीच्या पारदर्शकतेवर विश्वास बसला.
- संतोष कांबळे,
(विजेता अर्जदार)
हक्काचे घर मिळाले
एकत्रित कुटुंब असल्याने आजोबांसोबत मीरारोडला राहणाऱ्या घरातील जागा अपुरी पडत होती. म्हणून दुसऱ्या घराचा शोध सुरू होता. मी पहिल्यांदाच प्रयत्न केला आणि घर लागले. आता आजोबांच्या मालकीव्यतिरिक्त हक्काचे स्वमालकीचे घर झाले आहे.
- इक्बाल खान,
(विजेता अर्जदार)
आत्ता हप्त्याचे टेन्शन
मुंबई महानगरपालिकेत कामाला असल्याने परळ गावातील पाणीखात्याच्या वसाहतीमध्ये राहत आहे. मार्च २०१७ मध्ये निवृत्त होत असल्याने, डिसेंबर २०१६ मध्ये घर खाली करावे लागणार होते. मात्र, २२ लाख रुपये कुठून आणायचे, याचे टेन्शन आहे.
- काशिराम कदम,
(विजेता अर्जदार)