अन् त्याने विश्वविक्रमाला घातली गवसणी

By Admin | Published: July 2, 2017 02:45 AM2017-07-02T02:45:22+5:302017-07-02T02:45:22+5:30

वजन कमी करण्यासाठी त्याच्या पत्नीने ‘व्हेलेंटाईन डे’ ला त्याला एक सायकल भेट दिली. सायकलवरुन कामाच्या ठिकाणी ये-जा करु लागला. पुढे

And he is a world-record man | अन् त्याने विश्वविक्रमाला घातली गवसणी

अन् त्याने विश्वविक्रमाला घातली गवसणी

googlenewsNext

योगेश गाडगे/ लोकमत न्यूज नेटवर्क
दिघी : वजन कमी करण्यासाठी त्याच्या पत्नीने ‘व्हेलेंटाईन डे’ ला त्याला एक सायकल भेट दिली. सायकलवरुन कामाच्या ठिकाणी ये-जा करु लागला. पुढे सायकलवरच प्रवासाची सवय लागली. अन् एक दिवस त्याने सायकलवर १११ दिवसांत १५ हजार ४०० किलोमीटरचा प्रवास करुन जागतिक विक्रमाला गवसणी घातली. एवढचं नव्हे आरोग्यासाठी, पर्यावरणासाठी आलिशान मोटारीत फिरणाऱ्यांना त्याने सायकलीवर बसविणे शिकविले.
ही कथा आहे दिघीतील ध्येयवड्या संतोष होलीची. संतोष मुळचा सोलापूरचा. जेमतेम आयटीआय शिक्षणाच्या जोरावर नोकरी मिळत नव्हती. डोक्यावर छत नसल्याने कासारवाडी रेल्वे स्टेशनवरच रात्री मुक्काम ठरलेला. शेवटी अल्फा लावल या नामांकित कंपनीत टर्नर म्हणून तो रूजू झाला. काम सुरू असतानाच त्याने अभियांत्रिकीची पदविका व पदवी संपादन केली.
संतोषच्या खडतर आयुष्याला कलाटणी मिळाली ती त्याच्या लग्नानंतर. लग्नाअगोदर पिळदार शरीर कमवण्याचा नाद असल्याने शरीर सौष्ठव स्पर्धेत सहभागी व्हायचा. मात्र लग्नानंतर संतोषचे वजन वाढत गेले. वाढलेले वजन कमी करण्यासाठी त्याच्या पत्नीने व्हेलेंटाईन डे ला त्याला एक साधी सायकल भेट म्हणून दिली. याच सायकलीने त्याची जगभर कीर्ती पसरवली.
पुणे ते कन्याकुमारी हे १८०० किलोमीटर अंतर सायकलवर पार करून त्याने लिम्का बुकमध्ये नोंद केली. या यशामुळे व त्याच्या कुटुंबातील व्यक्तींच्या पाठबळामुळे त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. संतोषच्या यशाकडे बघून त्याच्या अल्फा लावल कंपनीतील उच्चपदस्थ अधिकारी व कामगार आठवड्यातील गुरुवार व शुक्रवार ‘सायकल डे’ म्हणून पाळतात. कंपनीत सायकल वरून येणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

1स्वामी विवेकानंद यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी संतोषने २०१४ ला जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारी फास्टेट गिअरलेस सायकलिंग करत सलग २३ दिवस ८ तास ४५ मिनिटे चालवून ३८०० कि.मी़ अंतर एकट्याने पार करीत भारतातील पहिला सायकलपटू होण्याचा मान मिळवला.
2जागतिक विक्रमाकडे लक्ष केंद्रित करीत त्याने १५,४०० कि.मी़ सायकलिंग करत सलग १११ दिवस २२ राज्यांतून यशस्वी प्रवास केला या क्रीडा प्रकारात गेअर नसणाऱ्या सायकलचा वापर करणारा जगात पहिला सायकलपटू ठरला आहे.

क्रीडा क्षेत्रात यशाचे शिखर गाठायचे असल्यास अत्याधुनिक साहित्य व सामग्री उपलब्ध होत नाही म्हणून खचून जाऊन अनेक तरुण क्रीडा प्रकाराकडे पाठ फिरवतात. या खचलेल्या नवतरुणांसाठी मी जागतिक विक्रम केला आहे. कुठल्याही क्षेत्रात ठसा उमटविण्यासाठी आधुनिक व महागड्या साधन सामग्रीशिवाय यश संपादन करता येते. फक्त तुमचा आत्मविश्वास, दृढसंकल्प दांडगा पाहिजे. सातत्य, सराव व चिकाटी असल्यास तुम्हाला कुणीही हरवू शकणार नाही.
- संतोष होली, जागतिक विक्रमवीर सायकलपटू

Web Title: And he is a world-record man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.