... आणि बंद हृदय पुन्हा धडधडले!

By admin | Published: November 6, 2016 04:24 AM2016-11-06T04:24:59+5:302016-11-06T06:43:27+5:30

रुग्णसेवेचे काम करीत असताना एका परिचारिकेला अचानक छातीत कळ आली. क्षणांत त्या बेशुद्ध पडल्या. तातडीने कार्डिओग्राम लावण्यात आला. त्यावर हृदयाचे ठोके बंद झाल्याचे दिसले.

... and the heart stopped again! | ... आणि बंद हृदय पुन्हा धडधडले!

... आणि बंद हृदय पुन्हा धडधडले!

Next

पिंपरी : रुग्णसेवेचे काम करीत असताना एका परिचारिकेला अचानक छातीत कळ आली. क्षणांत त्या बेशुद्ध पडल्या. तातडीने कार्डिओग्राम लावण्यात आला. त्यावर हृदयाचे ठोके बंद झाल्याचे दिसले. मात्र, सहका-यांनी तातडीने हालचाली करून उपचार केल्याने बंद पडलेले हृदय तब्बल अर्धा तासाने पुन्हा धडधडू लागले. अन् सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला.
माधुरी अशोक पंधारे या ‘वायसीएम’ रुग्णालयात परिचारिका म्हणून सेवेत आहेत. रुग्णसेवा सुरू असताना, अचानक त्या खुर्चीतून खाली कोसळल्या. सर्व काही संपले, असे समजून हताश झालेल्या सहकारी कर्मचारी, डॉक्टरांनी त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याचा प्रयत्न केला. बंद पडलेल्या हृदयाचे ठोके सुरू होण्याची आशा मावळली. तब्बल अर्धा तास झाला. सर्व काही संपले या हताश भावनेतून ‘शॉक ट्रीटमेंट’ हा अखेरचा प्रयत्न केला गेला. १३ ते १४ वेळा शॉक दिल्यानंतर जणूकाही चमत्कार झाला. बंद पडलेले हृदय पुन्हा धडधडू लागले. त्यानंतर
तातडीने उपचाराच्या हालचाली सुरू झाल्या. सहकाऱ्यांनी तत्परता दाखवल्याने त्या अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून बाहेर आल्या.
सहकारी परिचारिका कोसळताच वॉर्डमधील प्रतिभा टाकळकर, शोभा माने या सहकारी धावून आल्या. सीएमओला फोन करून कळविण्यात आले. सर्वांची धावपळ सुरू झाली. कार्डिअ‍ॅक मसाज देण्यात आला. वायसीएममधील रुबी अलकेअरच्या अतिदक्षता विभागात पंधारे यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले गेले. डॉ. सुजीत, तसेच माधुरी शिंगाडे व सहकारी परिचारिकांनी त्यासाठी धावपळ केली. ३१ आॅगस्टला सकाळी ११ला ही घटना घडली, तेव्हापासून १ सप्टेंबरच्या सायंकाळपर्यंत पंधारे बेशुद्धावस्थेत होत्या. कृत्रिम श्वासोच्छ्वासासाठी लावलेले व्हेन्टिलेटर दोन दिवस होते. एक सप्टेंबरच्या रात्री त्या शुद्धीवर आल्या. तीन दिवस उपचार सुरू असताना
पाच सप्टेंबरला शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित झाले. डॉ. डी. एम. कनोज यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सचिन हुंडेकरी, डॉ. काशिकर यांनी शस्त्रक्रिया यशस्वी केली. हृदयाला ‘पेस मेकर’ बसवले. हृदयाचे ठोके नियमित पडू लागले. जिवावरचे
संकट टळल्याने पंधारे यांनी सर्वांचे आभार मानले. (प्रतिनिधी)

सेवेत पुन्हा रूजू
जीवदान मिळालेल्या माधुरी पंधारे दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा कर्तव्य बजावण्यास सज्ज झाल्या आहेत. पुढील आठवड्यात त्या सेवेत रुजू होत आहेत. सुमारे १५ वर्षांपासून परिचारिका म्हणून काम करत असताना अनेकदा अतिदक्षता विभागात काम करावे लागले. आपणही रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी तत्परता दाखवली. तीच पुण्याई कामी आली. सहकाऱ्यांची योग्य वेळी मदत मिळाल्यामुळेच जीवदान मिळाले, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Web Title: ... and the heart stopped again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.