...तर कन्हैयाला ‘रानडे’त बोलावूच

By admin | Published: March 25, 2016 03:54 AM2016-03-25T03:54:50+5:302016-03-25T03:54:50+5:30

पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन विभागातील विद्यार्थ्यांनी जेएनयूमधील कन्हैयाकुमारला विभागात बोलाविण्यावरून उठलेल्या वादंगामुळे विद्यार्थ्यांनी कन्हैयाकुमारला

... and if you want to call Kanhaiya in 'Ranade' | ...तर कन्हैयाला ‘रानडे’त बोलावूच

...तर कन्हैयाला ‘रानडे’त बोलावूच

Next

पुणे : पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन विभागातील विद्यार्थ्यांनी जेएनयूमधील कन्हैयाकुमारला विभागात बोलाविण्यावरून उठलेल्या वादंगामुळे विद्यार्थ्यांनी कन्हैयाकुमारला आता विभागात आणणारच, असा चंग बांधला आहे.
पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन विभाग म्हणजेच रानडे इन्स्टिट्यूटमध्ये सोमवारी जेएनयू येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष आलोकसिंग चर्चेसाठी आला होता. त्याने रानडे इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांशी चर्चा केली. या पार्श्वभूमीवर जेएनयू येथील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमार यास बोलावून त्याची बाजू समजून घ्यावी, चर्चा करावी, असा मतप्रवाह विभागात असल्याचे रानडे इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांनी सांगितले.
यासंबंधीची चर्चा सुरू असताना, पुण्यातील भाजपा युवा मोर्चाचा कार्यकर्ता ओंकार कदम हा रानडे इन्स्टिट्यूटच्या कॅन्टीनमध्ये चहा पिण्यासाठी आला होता. त्याच्या कानावर ही गोष्ट गेल्यावर त्याने बुधवारी २३ मार्च रोजी सकाळी दहा वाजता रानडे इन्स्टिट्यूटमध्ये येऊन एका विद्यार्थ्याला गाठून धमकावण्यास सुरुवात केली. याविषयी ‘रानडे’मध्ये शिकत असणारा हर्षल लोहोकरे याने सांगितले की, ‘कदम वर्गात आला आणि त्याने आमच्या एका मित्राला धरले आणि कन्हैयाकुमारला बोलावल्यास ठोकून काढू, अशी धमकी दिली. तुम्हाला जर कन्हैयाकुमार भेटायची हौसच असेल तर रेल्वेच्या दोन बोगी बुक करून देतो. जेएनयूमध्ये जा आणि भेटा. पण जर पुण्यात त्याला आणले तर एकेकाला ठोकून काढेन,’ असे कदमने विद्यार्थ्यांना धमकावले. कदम याच्या या धमकीमुळे विद्यार्थ्यांनी डेक्कन पोलिसांकडे तक्रार दिली आहे. मात्र, या प्रकारामुळे इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थी संतप्त झाले आहेत. ‘आमच्या विभागात कोणाला आणायचे वा न आणायचे याबाबत इतरांनी सल्ला देण्याचे कारण नाही. तसेच अशा प्रकारे धमकावण्याची गरज नाही,’ असे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. कन्हैयाकुमारची बाजू समजून घेण्याचा हेतू असला, तरी त्याला आणण्याविषयीचा आग्रह नव्हता. मात्र, जर कोणी अशाप्रकारे अडवणूक करणार असेल तर काहीही करून कन्हैयाकुमारला रानडे इन्स्टिट्यूटमध्ये बोलावण्यात येईल, असा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे.


‘फर्ग्युसन’प्रकरणी २५० जणांवर गुन्हा
फर्ग्युसन महाविद्यालयात बुधवारी झालेल्या गोंधळाप्रकरणी
डेक्कन पोलिसांनी विविध राजकीय पक्षांसह संघटनांच्या २५० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अभाविपने मंगळवारी विनापरवाना आयोजिलेल्या ‘जेएनयू का सच’ या कार्यक्रमात गोंधळ झाला होता. गोंधळानंतर डाव्या तसेच आंबेडकरी विचारांच्या विद्यार्थी संघटनांच्या समर्थनासाठी बुधवारी महाविद्यालयात आलेल्या जितेंद्र आव्हाड यांना धक्काबुक्की करण्यात आली. या वेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आपसांत भिडले. पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करताना सौम्य लाठीमार केला.

Web Title: ... and if you want to call Kanhaiya in 'Ranade'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.