...आणि वकिलाच्या पत्नीने पोलीस ठाण्यातच घेतला पतीचा चावा
By admin | Published: March 1, 2017 01:59 AM2017-03-01T01:59:52+5:302017-03-01T01:59:52+5:30
पोलीस ठाण्यात पतीचा कडकडून चावा घेत मुलीचा ताबा मिळविल्याची धक्कादायक घटना मुलुंडमध्ये घडली.
मनीषा म्हात्रे,
मुंबई- पती-पत्नीच्या वादानंतर मुलगी आपल्यासोबत राहावी म्हणून अॅड. पत्नीने पोलीस ठाण्यात पतीचा कडकडून चावा घेत मुलीचा ताबा मिळविल्याची धक्कादायक घटना मुलुंडमध्ये घडली. जखमी पतीच्या तक्रारीवरून मुलुंड नवघर पोलिसांनी अॅड. पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मुलुंड पूर्वेकडील नवघर परिसरात हे हायप्रोफाईल दाम्पत्य राहते. २००९मध्ये निरजची (नाव बदलले आहे) सोशल मीडियावरील विवाह नोंदणी स्थळावर नेहासोबत (नावात बदल) भेट झाली. निरज मराठी तर नेहा बंगाली. नेहा अॅड. तर निरजने एमबीए फायनान्सची पदवी घेतलेली. त्यानंतर तो एका नामांकित कंपनीत उच्चपदावर काम करत होता. दोघांचा विवाह झाला. मात्र लग्नाच्या वर्षभरातच नेहाच्या तापट स्वभावामुळे दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. तरीदेखील दोघांमधील वाद सुरूच होते.
२५ तारखेच्या रात्री दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. नेहाने निरजला मारहाण करून घराबाहेर काढले. तो दोन वर्षांच्या मुलीसोबत बाहेर पडला. नेहाने थेट नवघर पोलीस ठाणे गाठून दोघे हरविल्याची तक्रार दिली. नेहाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला. अशात निरजचा फोन सुरू होताच त्याला पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले. मात्र या घटनेमुळे निरजलाही धक्का बसला. त्यात पोलिसांनी दोघांची समजूत काढण्यासाठी नेहालाही तेथे बोलावून घेतले. त्या वेळेस निरजने पोलिसांना विनवणी केली, की पत्नीला बोलावू नका. अखेर काही वेळातच नेहा तेथे दाखल होताच तिने निरजकडून मुलीला आपल्या ताब्यात घेण्यासाठी वाद सुरू केला.
वाद एवढा टोकाला पोहोचला की मुलीचा ताबा मिळविण्यासाठी तिने त्याच्या हातावर कडकडून चावा घेतला. पोलिसांच्या मदतीने तिला त्याच्या हातापासून दूर करण्यात आले. या चाव्यात त्याच्या हातावर खोलवर जखम झाली आणि तो खाली कोसळला.
त्याला जवळच पालिकेच्या सावरकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेच्या दिवशी नेहाने वृद्ध आईलाही मारहाण केली. त्यामुळे त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे निरजने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
>परिसरात खळबळ
सोमवारी त्याने नवघर पोलीस ठाण्यात नेहाविरुद्ध तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून ३२४चा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला असल्याची माहिती नवघर पोलिसांनी दिली. पोलिसांसमोरच रंगलेल्या या ड्रामामुळे मुलुंड परिसरात खळबळ उडाली होती.