अन् ‘लीलावती’कडे नेत्यांची धाव
By admin | Published: February 17, 2015 02:16 AM2015-02-17T02:16:15+5:302015-02-17T02:16:15+5:30
सोमवारी सकाळी धडकू लागताच राष्ट्रवादीचे विविध नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांनी लीलावती हॉस्पिटलकडे धाव घेतली.
पदाधिकारी-कार्यकर्त्यांची रीघ : आबांची प्रकृती जाणून घेण्यासाठी झाली गर्दी
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची प्रकृती खालावल्याची बातमी आज, सोमवारी सकाळी धडकू लागताच राष्ट्रवादीचे विविध नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांनी लीलावती हॉस्पिटलकडे धाव घेतली. सकाळपासूनच आर. आर. पाटील यांच्या प्रकृतीबाबत उलटसुलट चर्चा व्हॉट्सअॅप आणि अन्य सोशल मीडियात सुरू होती. आबांच्या प्रकृतीबाबत अशी चर्चा असताना कोणतीच अधिकृत माहिती उपलब्ध होत नव्हती.
त्यामुळे परिस्थिती जाणून घेण्यासाठी आबांच्या चाहत्यांसह राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकाऱ्यांनी लीलावती हॉस्पिटलमध्ये गर्दी केली. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी आबांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती दिल्यानंतरही चाहत्यांचे समाधान होत नव्हते. अनेक उपस्थितांनी विविध सूत्रांकडून आबांच्या प्रकृतीची खातरजमा करण्याचे प्रयत्न चालविले होते. दुपारी आबांना जीवरक्षक यंत्रणेवर ठेवण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांच्या हवाल्याने देण्यात आली; तोपर्यंत हॉस्पिटलसमोर मोठी गर्दी जमा झाली होती.
दुपारपर्यंत सर्वच नेत्यांनी आबांची प्रकृती स्थिर असून लवकरच ते बरे होतील; त्यांच्यासाठी प्रार्थना करा, असे सांगत उपस्थितांना धीर देण्याचा प्रयत्न केला. अखेर सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आबांची प्राणज्योत मालवल्याची बातमी आली. त्यानंतर मात्र उपस्थितांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सायं. ५.३० च्या सुमारास लीलावती इस्पितळात पोहोचले. आबांच्या पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी तेथेच अजित पवार आणि अन्य नेत्यांशी चर्चा केली. आबांच्या प्रकृतीची बातमी समजताच लीलावतीदरम्यान गर्दीमुळे वाहतुकीची समस्या उद्भवण्याची शक्यता होती.
सर्वांच्याच अश्रूंचा
बांध फुटला
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर सायंकाळी आबांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी नरिमन पॉइंट येथील राष्ट्रवादी भवन येथे आणले होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांच्या नेत्यांनीही त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. दरम्यान, आबांची कन्या तेथे दाखल झाली आणि सर्वांनाच अश्रू अनावर झाले.
विनम्रता, उत्तम वक्ता, सर्वसामान्यांचा नेता, एक संवेदनशील आणि सामाजिक प्रश्नांची जाण असलेले व्यक्तिमत्त्व हरपले आहे.
- रवींद्र वायकर,
गृहनिर्माण राज्यमंत्री
लोकांमध्ये स्वच्छ चारित्र्याचे व प्रामाणिक नेते अशी त्यांची प्रतिमा होती. त्यांच्या जाण्याने सामाजिक जाण असलेले कार्यक्षम नेतृत्व हरपले.
- देवदास मटाले,
अध्यक्ष, मुंबई पत्रकार संघ
सर्वसामान्यांसह महिलांसाठी आबांनी खूप काम केले आहे. त्यांच्या निधनाने राज्याचे मोठे नुकसान झाले. शिवसेनेतर्फे मी त्यांना श्रद्धांजली वाहते.
- नीलम गोऱ्हे, मंत्री
आणि प्रवक्त्या, शिवसेना
आर. आर. यांच्या निधनाने राजकारणातले गाडगेबाबाच गेले आहेत. महाराष्ट्रातील स्वच्छ राजकारणाचे आणि चारित्र्याचे ते मूर्तिमंत प्रतीक होते.
- कपिल पाटील, आमदार
त्यांचा आजार दुर्धर होता तरीही ईश्वरी कृपेने ते या संकटावर मात करतील, अशी आशा होती. परंतु नियतीचे कठोरपण प्रत्ययास आले. आमदार म्हणून ते विधिमंडळात आले. पण शेवटी पुन्हा आमदार म्हणूनच त्यांनी विधिमंडळाचा व या वसुंधरेचा निरोप घेतला.
- वसंत डावखरे, राष्ट्रवादी
सामाजिक आयुष्यातील सर्वांत वाईट दिवस. ग्रामविकासाची जाण असणारा, प्रचंड संवेदनशील राजकारणात राजकारण्याप्रमाणे न वागणारा, सर्वसामान्यांचा आधार आर. आर. पाटील होते. तसेच राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक क्षेत्रात मैत्री जपणारा आदर्श गाव हिवरेबाजार गावाचा कुटुंबप्रमुखाचा आधार गेला.
- पोपटराव पवार,
कार्याध्यक्ष, आदर्शगाव योजना
आबा हे राजकारणातील समर्पित वृत्ती, सेवाभाव आणि सुसंस्कृतपणाचे प्रतीक होते. गरिबीशी संघर्ष करीत स्वकर्तृत्वाने ते पुढे आले.
- शिवाजीराव देशमुख,
विधान परिषदेचे सभापती
आबा अजातशत्रू होते. विद्वत्ता, प्रामाणिकपणा, निष्ठा, विनम्रता आणि उत्तम वक्तृत्व हे त्यांचे गुण होते. सामान्यांच्या सुखदु:खाशी समरस होणारा एक झुंजार नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.
- धनंजय मुंडे, राष्ट्रवादी
राजकारण व समाजकारणात आधार नसलेल्या कार्यकर्त्याला ते नेहमीच हक्काचे वाटायचे. विरळा असा चारित्र्यवान नेता समाजाने आज गमावला आहे.
- प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, माजी मंत्री
नम्रता आणि उत्तम वक्तृत्वामुळे सर्वांचे आवडते ठरलेल्या आबांना राजकारणात कुणी शत्रूच नव्हते.
- रामदास आठवले, खासदार