... आणि गोव्यातील मांडवी पुल कोसळल्याची आठवण झाली ताजी
By Admin | Published: August 3, 2016 08:51 PM2016-08-03T20:51:10+5:302016-08-03T20:51:10+5:30
1986 सालचा 5 जुलैचा तो दिवस. देशाच्या इंजिनिअरिंग विज्ञान क्षेत्रत या दिवसाचा आरंभच खळबळ उडवून देणारा ठरला. 1970 साली बांधलेला मांडवी पुल केवळ
- सदगुरू पाटील
पणजी, दि. ३ - 1986 सालचा 5 जुलैचा तो दिवस. देशाच्या इंजिनिअरिंग विज्ञान क्षेत्रत या दिवसाचा आरंभच खळबळ उडवून देणारा ठरला. 1970 साली बांधलेला मांडवी पुल केवळ सोळा वर्षात 5 जुलै रोजी सकाळी कोसळला आणि पणजीचा पर्वरीसह उत्तर गोव्याच्या अन्य भागांशी असलेला संबंध तुटला. केवळ पणजीच नव्हे तर पूर्ण गोवा त्या दिवशी अंतर्बाह्य हादरून गेला. गोवा- मुंबई मार्गावरील महाड येथील पुल कोसळण्याच्या घटनेमुळे सोमवारी पणजीवासियांच्या व एकूणच गोव्यातील अनेकांच्या मनात मांडवी पुल दुर्घटनेची घटना ताजी झाली.
मांडवी पुल कोसळण्याच्या घटनेस आता 30 वर्षे झाली. अजुनही त्या दुर्घटनेच्या खाणाखुणा मांडवी नदीच्या अंगावर दिसून येतात. त्या दुर्घटनेनंतर मांडवीवर दुसरा नवा पुल बांधला गेलाच, शिवाय आता तिसरा पुलही बांधला जात आहे. 1970 साली मांडवीवर बांधलेला पुल सोळा वर्षातच कोसळेल, असे कुणालाच वाटले नव्हते. हैद्राबाद येथील पायोनियर कंपनीने या पुलाचे बांधकाम केले होते. पुलाचे प्री-स्ट्रेस्ड केबल गंजले होते. मांडवी नदीतून जे लोक प्रवास करत होते, त्यांना छत गळल्याप्रमाणो पुल गळतानाही त्यावेळी दिसत होते. मात्र तो पुल कोसळू शकतो, अशी कल्पना त्यावेळी बांधकाम खात्यालाही आली नव्हती. पुल कोसळल्यानंतर आत रिक्षा पडल्याची भीतीयुक्त चर्चा पसरली होती पण प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. त्या दुर्घटनेत मानवी हानी टळली. एक बसगाडी पुढे गेली व मागे पुल कोसळला, असा अनुभव त्या दुर्घटनेच्या काळी जी माणसे युवावस्थेत होती, ती अजुनही सांगतात. गोव्यात तत्पूर्वी एवढा मोठा पुल कोसळण्याची घटना कधीच घडली नव्हती व त्यानंतरही घडली नाही. खनिज खाण कोसळणो, डोंगराचा भाग कोसळणो, इमारत कोसळून त्यात 32 जणांचा बळी जाण्याच्या घटनाही गोव्यात घडल्या पण मांडवी नदीवरील वरवर भक्कम दिसणारा पुल कोसळण्याची घटना 86 साली घडली, त्याची आठवण महाडच्या दुर्घटनेने जागी केली व अनेक गोमंतकीयांच्या काळजाचा ठोका क्षणभरासाठी चुकला.