...अन् स्मृती इराणी रमल्या खरेदीत !
By admin | Published: February 20, 2016 01:14 AM2016-02-20T01:14:01+5:302016-02-20T01:14:01+5:30
रस्त्याने जाताना दुकानात एखादी आकर्षक वस्तू दिसली, की ती वस्तू आपल्या घरात असावी, असा मोह महिलांना असतो
पुणे : रस्त्याने जाताना दुकानात एखादी आकर्षक वस्तू दिसली, की ती वस्तू आपल्या घरात असावी, असा मोह महिलांना असतो. देशाच्या राजकारणातील एक उमदे आणि महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व व केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री असलेल्या स्मृती इराणी यांनाही पुण्यात हा मोह आवरता आला नाही. शुक्रवारी कर्वेनगरमधील एका कार्यक्रमानंतर त्यांचा ताफा कोथरूडमधून मुख्य रस्त्याने जात असताना तो अचानक एका भांड्याच्या दुकानासमोर थांबला. केंद्रीय मंत्री म्हणून कोणताही बडेजाव न करता अगदी साधेपणाने त्या दुकानात शिरल्या अन् चक्क भांडी न्याहाळू लागल्या. त्यामुळे दुकानदारही भांबावून गेला. तर केंद्रीय मंत्र्यांना भांडी खरेदी करताना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली.
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी शुक्रवारपासून दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी सकाळी आयसरमध्ये आणि दुपारी डेक्कन कॉलेजमध्ये त्यांचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमानंतर सायंकाळी कर्वेनगर येथील कमिन्स कॉलेजच्या रौप्यमहोत्सवी समारंभात त्या प्रमुख पाहुण्या होत्या. हा कार्यक्रम झाल्यानंतर मंत्र्यांचा ताफा कर्वेनगरमधून कोथरूडच्या दिशेने निघाला. कोथरूडमध्ये मुख्य रस्त्यावर जात असताना त्यांची गाडी अचानक एका भांड्याच्या दुकानासमोर येऊन उभी राहिली. लाल दिव्याची गाडी थांबल्याने आजूबाजूने जाणाऱ्या लोकांच्या नजराही खिळून राहिल्या. गाडीतून चक्क केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या उतरल्याचे पाहून सगळे अवाक झाले.
गाडीतून उतरून इराणी थेट भांड्यांच्या दुकानात गेल्या अन् त्यांची भांडी खरेदीची लगबग सुरू झाली. केंद्रीय मंत्र्याच्या अचानक येण्याने दुकानदारही भांबावून गेला. दुकानाबाहेर लाल दिव्याची गाडी अन् पोलीस पाहून ये-जा करणाऱ्यांचीही त्यांना पाहण्यासाठी गर्दी झाली होती.
खरेदीच्या गडबडीतही त्या बाहेर उभ्या असलेल्या लोकांना हात करून प्रतिसाद देत होत्या. त्यानंतर त्यांनी अनेकांना आपल्यासोबत सेल्फी काढण्याची संधी दिली. लोकांशी मनमोकळा संवादही साधला. त्यातही मंत्री महोदयांनी महिलांना प्रथम प्राधान्य दिले. काहींनी सरकारचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. इराणी यांनीही या शुभेच्छांचा आनंदाने स्वीकार करीत खरेदीचा आनंद लुटला.
‘‘केंद्रीय मंत्री असल्याचा कुठलाही बडेजाव न आणता स्मृती इराणी यांनी
लोकांशी संवाद साधला. आमच्यासोबत फोटो काढले. इतका साधेपणाने लोकांमध्ये मिसळणारा केंद्रीय मंत्री आम्ही पहिल्यांदाच पाहिला,’’ अशी भावना दुकानात उपस्थित असलेल्या प्रा. जयश्री अरुण मोकाशी यांनी व्यक्त केली.