...आणि माझ्या दोस्ताने इतिहास घडविला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 05:33 AM2018-08-25T05:33:08+5:302018-08-25T05:34:01+5:30
३ जानेवारी, १९८५ रोजी ‘मोरूची मावशी’ हे आमचे नाटक सुरू झाले. या नाटकासाठी विजय चव्हाणचे नाव लक्ष्मीकांत बेर्डे याने सुचविले होते.
- प्रशांत दामले
/>
३ जानेवारी, १९८५ रोजी ‘मोरूची मावशी’ हे आमचे नाटक सुरू झाले. या नाटकासाठी विजय चव्हाणचे नाव लक्ष्मीकांत बेर्डे याने सुचविले होते. मग आमची टीम तयार झाली. आमची मुळात ‘टूरटूर’ची गँग होती. वास्तविक, मावशीचे काम लक्ष्मीकांतने करावे, असे सुधीर भट यांचे म्हणणे होते, पण त्याने विजयला पुढे केले. दिलीप कोल्हटकर हे या नाटकाचे दिग्दर्शक होते. रवींद्र नाट्य मंदिरात आमच्या तालमी चालायच्या. या नाटकातले गद्य कमी करून त्यातले पद्य वाढवावे, असा निर्णय कोल्हटकरांनी घेतला. मंगेश कुलकर्णीने पाच-सहा पानांची गाणी बनविली. अशोक पत्कींनी चाली दिल्या. असे करत करत या नाटकाने जवळजवळ ‘संगीत मोरूची मावशी’ असे रूप धारण केले. विजयला शंभर टक्के आत्मविश्वास हा आधीपासूनच होता, पण त्याचे जरा गाण्यापाशी अडकायचे. मात्र, त्याने त्याच्या आत्मविश्वासाच्या बळावर तेही साध्य करून दाखविले. या नाटकातल्या ‘टांग टिंग टिंगा’ या विजयच्या गाण्याने अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आणि मग इतिहासच घडला.
१९८५ मध्ये आमचे ‘मोरूची मावशी’ हे नाटक आले आणि १९८६ मध्ये माझे ‘ब्रह्मचारी’ हे नाटक आले. ‘ब्रह्मचारी’ या नाटकात मी मुख्य भूमिका साकारावी, असे सुधीर भट यांनी मला सांगितले. मी त्यासाठी तयार नव्हतो, कारण माझे ‘मोरूची मावशी’ हे नाटक चांगले सुरू होते. नीट चाललेले नाटक सोडून नवीन नाटकात कसे काम करायचे, असा प्रश्न मला पडला होता, पण विजय चव्हाण याने याबाबत पुढाकार घेतला. त्याने मला बाजूला घेऊन समजावले. प्रशांत, तुला मेन रोलचा चान्स मिळतोय, तर तू ते नाटक करायला हवेस आणि त्यातून जेव्हा तुला ‘ब्रह्मचारी’चा प्रयोग नसेल, तेव्हा तू ‘मोरूची मावशी’ करत जा. अर्थात, आम्ही तुला मिस करू, पण त्यासाठी तू मोठा रोल सोडू नकोस. असे सांगून विजयने माझी मानसिक तयारी करून घेतली. सहकारी कलाकाराकडून मिळणारी अशी वागणूक फार दुर्मीळ असते. मला वाटत होते की, ‘मोरूची मावशी’मध्ये मी मोरूची भूमिका केली नाही, तर दुसऱ्या कुणाला तरी उभे केले जाईल. अशाने नाटकाची भट्टी बिघडण्याचा संभव असतो, पण विजयने माझे काही एक ऐकले नाही आणि मी ‘ब्रह्मचारी’ केले.
विजयची आणि माझी छान दोस्ती होती. आम्ही एकत्र चित्रपटसुद्धा खूप केले. विजय चव्हाण म्हणजे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे कॉम्बिनेशन होते. विजयने अनेक भूमिका शून्यातून निर्माण केल्या. आपल्याकडे जे आहे, ते जास्तीतजास्त रुचकर करून कसे सादर करता येईल हे तो पाहायचा. एखाद्या सीनमध्ये जरी दम नसला, तरी त्यात आपल्याला वेगळे काही कसे करता येईल, याचा विजय मनापासून प्रयत्न करायचा. त्याने कधी पाट्या टाकल्याचे मला आठवत नाही. अतिशय मन लावून तो काम करायचा. त्याच्या यशाची तीच पावती म्हणायला हवी.
(शब्दांकन : राज चिंचणकर)