...अन् झिरवाळ यांनी काढून फेकला सदरा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 10:27 AM2024-10-05T10:27:18+5:302024-10-05T10:27:30+5:30
पाठोपाठ इतर आदिवासी आमदारांनी जाळीवर उडी मारली. त्यानंतर पोलिस यंत्रणेची धावपळ झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पेसा भरतीच्या मागणीसाठी आदीवासी आमदारांनी आंदोलन करत मंत्रालयात गोंधळ घातला. मंत्रिमंडळ बैठकीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला भेटतील या आशेने आलेल्या आमदारांची निराशा झाली. त्यामुळे संतापलेल्या विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयातच आपला शर्ट काढून फेकला.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी बुधवारी हे आमदार सात तास सह्याद्री अतिथीगृहावर थांबले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्याने आमदार संतप्त झाले होते. त्यानंतर आदिवासी समाजाचे आजी-माजी आमदार आणि खासदार शुक्रवारी सकाळी नऊ वाजता विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या शासकीय निवासस्थानी जमा झाले. पेसा भरतीवरून आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय झाला. त्यानंतर हे आमदार मुख्यमंत्र्यांना भेटायला मंत्रालयात पोहचले. सातव्या मजल्यावर जिथे राज्य मंत्रिमंडळ बैठक होती, तिथे जाऊन हे आमदार थांबले. मुख्यमंत्री बैठकीसाठी येताच आमदारांनी त्यांचा रस्ता अडवला. तुमचे काम करतो आहे, तुम्ही माझा रस्ता कशाला अडवता, असे म्हणून मुख्यमंत्री न थांबताच थेट मंत्रिमंडळ बैठकीला निघून गेले. त्यामुळे आदिवासी आमदार संतप्त झाले. आदिवासी लोकप्रतिनिधींना मुख्यमंत्री भेटत नसल्याच्या भावनेने संतप्त असलेले झिरवाळ यांनी अंगातील सदरा काढून फेकून दिला आणि थेट दुसऱ्या मजल्यावरील जाळीवर उडी मारली.
पाठोपाठ इतर आदिवासी आमदारांनी जाळीवर उडी मारली. त्यानंतर पोलिस यंत्रणेची धावपळ झाली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आमदारांना जाळीवरून बाहेर येण्याची विनंती केली. १५ ते २० मिनिटांनंतर हे आमदार जाळीवरून बाहेर आले. मात्र, या आमदारांनी दुसऱ्या मजल्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. दुसरीकडे सातव्या मजल्यावर मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर मंत्री गिरीश महाजन आणि अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन दुसऱ्या मजल्यावर आले आणि झिरवाळ यांच्यासह या आमदारांना घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सातव्या मजल्यावर घेऊन गेले. तिथे मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाल्यानंतर आमदारांनी हे आंदोलन मागे घेतले.