...अन् अधिकाऱ्यांनी सोडला सुटकेचा नि:श्वास; ४८ तासांपासून होते गॅसवर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 03:07 AM2019-09-28T03:07:02+5:302019-09-28T06:58:53+5:30
पवारांनी काढली ईडीच्या गुन्ह्यातील हवा
मुंबई : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात जाण्याचा नियोजित दौरा रद्द
केल्याने इडीच्या अधिकाऱ्यांनी अक्षरश: सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यांच्या भेटीमुळे उद्भवणारी राजकीय परिस्थिती आणि दिल्लीतील वरिष्ठांचा त्याबाबत होणारा समज, यातून आपसुकच सुटका झाल्याने जवळपास ४८ तासांनंतर अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यांवरील तणाव दूर झाला.
राज्य सहकारी बॅँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याने पवार यांनी बुधवारी ‘बिन बुलाये मेहमान’ बनून ईडीच्या कार्यालयात स्वत:हून जाण्याचे जाहीर केले. तेव्हापासून या संभाव्य घटनेला कसे सामोरे जायचे? याबाबत अधिकाºयांत संभ्रम होता. कार्यालयात हजर राहण्याची आवश्यकता नाही, तूर्तास चौकशीची गरज नसल्याचे कळवूनही पवार यांनी भूमिका बदलली नव्हती.
त्यामुळे ते आले तर त्यांचे म्हणणे ऐकून घेणे किंवा त्यांनी निवेदन दिल्यास ते स्वीकारायचे, त्यांचा जबाब किंवा गैरव्यवहाराविषयी कोणतीही विचारणा करावयाची नाही, असा निर्णय अधिकाºयांनी घेतला. मात्र त्यामुळे या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटण्याच्या शक्यतेने अधिकाºयांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण होते. त्यामुळे अधिकारी सकाळी १० पूर्वीच कार्यालयात हजर झाले. मात्र मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी पवार यांच्या चर्चगेट येथील ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी जात त्यासंबंधी केलेली शिष्टाई यशस्वी ठरली. आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ईडीकडे जाणार नसल्याचे जाहीर करीत पवार पुण्याकडे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले.
पवारांनी काढली ईडीच्या गुन्ह्यातील हवा
ईडीने शरद पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यापासून गेल्या तीन दिवसांपासून राज्यात खळबळ उडाली होती. ईडीने राजकीय दबावाखाली ही कारवाई केल्याची उघड टीका विरोधी पक्षांबरोबरच शिवसेना आणि सामान्य नागरिकांतूनही व्यक्त होत होती. मात्र पवार यांनी स्वत: कार्यालयात जाण्याची भूमिका घेत हे अस्त्र त्यांच्यावर उलटविले. त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे या गुन्ह्याची हवाच निघून गेल्याचे मत ईडीतील सूत्रांकडून व्यक्त करण्यात आले.