...अन् पुन्हा उलगडला इतिहास
By admin | Published: January 23, 2016 02:39 AM2016-01-23T02:39:36+5:302016-01-23T02:39:36+5:30
वेळ सकाळी दहाची... नेहमीप्रमाणे शनिवारवाडा पाहण्यासाठी आलेले पर्यटक वाड्याचा दिंडी दरवाजा उघडण्याची वाट पाहत उभे होते.
पुणे : वेळ सकाळी दहाची... नेहमीप्रमाणे शनिवारवाडा पाहण्यासाठी आलेले पर्यटक वाड्याचा दिंडी दरवाजा उघडण्याची वाट पाहत उभे होते. मात्र वाड्यासमोर काढण्यात आलेली भली मोठी रांगोळी पाहून काही तरी कार्यक्रम असण्याचा विचार करत असतानाच, अचानक शनिवारवाड्याचा दिंडी दरवाजा न उघडता मुख्य दरवाजा उघडतो आणि समोर असलेल्या वाड्याची ही भव्यता पाहून आणि नजरेसमोर रिद्धी-सिद्धी गणेशमूर्तीचे चित्र पाहून पर्यटकही भारावूनही जातात...
निमित्त होते शनिवारड्याच्या तब्बल २८४ वर्षांपूर्वी झालेल्या वास्तूशांती कार्यक्रमाचे. या दिनाचे औचित्य साधून शनिवारवाड्याचा मुख्य दरवाजा पुरातत्त्व विभागाकडून कित्येक दशकानंतर शुक्रवारी सकाळी १० ते ११ या वेळेत पर्यटकांसाठी उघडण्यात आला.
आजच्या दिवशी शनिवारवाडा उघडला जावा, अशी मागणी थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठाणच्या वतीने पुरातत्त्व विभागाकडे करण्यात आली होती, असे प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे यांनी सांगितले. त्या मागणीस पुरात्तत्व विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आल्यानंतर या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
पुणे शहराचे वैभव असलेल्या गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ शनिवारवाड्यातच झाली असून पेशवेकाळातील गणेशोत्सव अतिशय मोठ्या पद्धतीने आणि दिमाखात साजरा केला जात होतो. त्यामुळे वाड्यामध्ये गणेशोत्सव साजरा करण्याची मागणीही पुरातत्त्व विभागाकडे करण्यात आली असल्याचे नंदकुमार साठे म्हणाले.
या कार्यक्रमास इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे, प्रतिष्ठानचे अनिल गाणू, हरिभाऊ चितळे, माधव गांगल, नगरकर, चितांमणी क्षीरसागर, कशीकर उपस्थित होते.
पुण्याचा ऐतिहासिक परंपरेची साक्ष देणाऱ्या वाड्याचे भूमिपूजन १० जानेवारी १७३० मध्ये करण्यात आले होते. २२ जानेवारी १७३२ रोजी वास्तूशांती झाली.
जून १८१८ मध्ये शनिवारवाडा इंग्रजांच्या ताब्यात गेला. वाड्यावर युनियन जॅक फडकवून इंग्रजांनी पुण्यात ब्रिटिश सैन्याचे संचलनही केले. त्यानंतर १९१३ मध्ये तत्कालीन गव्हर्नर लॉईड यांनी हा वाडा संरक्षित वास्तू म्हणून घोषित केली. १८२८ मध्ये या वाड्याला लागलेल्या आगीत संपूर्ण वाडाच भस्मसात झाला. या आगीनंतर, या वाड्याची केवळ तटबंदीच राहिली आहे. त्यानंतर पुरातत्त्व विभागाने हा वाडा ताब्यात घेतल्यानंतर या वास्तूचे जतन झाले आणि त्यानंतर हा दरवाजा कायमचा बंद झाला. (प्रतिनिधी)