...आणि म्हणे हिंदू धर्म परमसहिष्णू आहे!

By admin | Published: September 11, 2015 03:37 AM2015-09-11T03:37:49+5:302015-09-11T03:37:49+5:30

श्रावण मास अजून संपलेला नाही. या संपूर्ण महिन्यात म्हणे हिंदू धर्मातील परम भावभोळे सामीष भोजनाला स्पर्श करीत नाहीत. महिनाभराचा उपवास होणार या भावनेनेच कापरे

... and say Hindu religion is immoral! | ...आणि म्हणे हिंदू धर्म परमसहिष्णू आहे!

...आणि म्हणे हिंदू धर्म परमसहिष्णू आहे!

Next

-  हेमंत कुलकर्र्णी 
श्रावण मास अजून संपलेला नाही. या संपूर्ण महिन्यात म्हणे हिंदू धर्मातील परम भावभोळे सामीष भोजनाला स्पर्श करीत नाहीत. महिनाभराचा उपवास होणार या भावनेनेच कापरे भरणाऱ्या त्यांच्या जिव्हांनी त्यांना दिव्याच्या अमावस्येलाच गटारीची आवस बनवून टाकण्यासाठी उद्युक्त केलेले.
मुळात केवळ श्रावणातच नव्हे, तर चतुर्मासात वातुळ म्हणजे पचायला जड पदार्थांचे सेवन बव्हंशी धर्मांनी (अगदी हिंदू धर्मासकट) त्याज्य ठरविले कारण तेव्हा पावसाळा असतो आणि या काळात पोटातील अग्नी मंद होत असतो. म्हणजे सामीष पदार्थांच्या सेवनाचा संबंध थेट आरोग्य रक्षणाशी आहे. पूर्वी ते सांगून पटले नसते म्हणून त्याला धर्माची जोड, इतकेच. तरीही जे महिनाभर दम धरू शकतात, त्यांचा जीव चार-आठ दिवस दम धरायला इतका कासावीस व्हावा?
तरीही श्रावण वगळता एरवी रोजच मांसाहार करणारे, तो खिशाला आणि पोटालाही परवडू शकणारे असे कितीसे लोक आहेत? मटण फार महाग झाले हो, परवडत नाही,
अशी तक्रार कोणाची असते? आठवड्यातले रविवार आणि
बुधवार वगळता, अन्य दिवशी मांसाहार वर्ज्य मानणारे बहुसंख्य आहेत. उरलेले पाच दिवस मग ते कशी तग धरू शकतात?
संपूर्ण श्रावण महिना आणि आठवड्यातले पाच दिवस नित्याचे मांसाहारी मांसभक्षण करीत नाहीत तेव्हा केवळ त्याच व्यवसायावर ज्यांचे पोट आहे, त्यांच्या पोटाची काळजी कोण वाहत असते?
तरीही रोज मांसमच्छी खाल्ल्याशिवाय ज्यांचे पानच हलू शकत नाही असेच बहुसंख्य लोक महाराष्ट्रात आहेत, असे गृहीत धरले आणि त्यांनी त्यांच्या होणाऱ्या संभाव्य उपासमारीसाठी आकाश-पाताळ एक करण्याचा उपक्रम सुरू केला तर लोकशाहीने त्यांना तो अधिकार दिलाच आहे.
पण लोकशाहीने कोणालाही परधर्माविषयी आणि परधर्माच्या आस्थांविषयी अत्यंत हिणकस उद्गार काढण्याचा अधिकार दिलेला नाही. का मग येथेही बहुसंख्य आणि अल्पसंख्य असा भेद केला जातो आणि जे अल्पसंख्य आहेत पण आक्रमक नाहीत कारण त्यांच्या धर्मातच अहिंसा आहे त्यांची अवहेलना करण्याची मोकळीक आहे, असे मानले जाते.
महाराष्ट्रातील तमाम मांसभक्षकांचे केवळ आपणच तारणहार आहोत असे मानणाऱ्यांच्या दुभंगातून एरवी किरकोळ वाटणारा वाद गलिच्छपणाच्या मर्यादा पार करून गेला आहे.
जैन धर्मातील दिगंबरांची अवहेलना करतानाच त्र्यंबकेश्वरी जमणाऱ्या नागा साधूंच्या दर्शनाची अभिलाषा बाळगणाऱ्यांनी जरा त्या नागा साधूंविषयीदेखील असेच हिणकस उद्गार काढून पाहावेत. ‘रक्त की नदीयाँ बहेंगी’! दुर्बळांवर वा अहिंसेचा स्वीकार करणाऱ्यांवर वार करण्यात कोणते आले आहे मोठे शौर्य?
‘आमच्या खाण्या-पिण्यावर बंदी आणणारे कोण? आम्हाला घटनेनेच आहार स्वातंत्र्य दिले आहे,’ अशी वकिली करणारे उद्या नरमांसभक्षकही होणार आहेत? होतीलही कदाचित. पण तेव्हा येईल ती राज्यघटना त्यांच्या मदतीला?

Web Title: ... and say Hindu religion is immoral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.