...आणि ती आईच्या कुशीत विसावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 02:14 AM2017-08-11T02:14:56+5:302017-08-11T02:14:56+5:30
आपल्या कुटुंबीयांसमवेत अष्टविनायक यात्रेला निघालेल्या सोलापूर येथील भाविकाची अडीच वर्षे वयाची मुलगी थेऊर येथे विसरून राहिली. ३० किलोमीटर दूर गेल्यानंतर त्यांच्या गाडीत मुलगी नसल्याचे लक्षात आले. सुरक्षारक्षक विश्वस्त व व्यवस्थापक यांच्या सतर्कतेमुळे पुन्हा आई-वडिलांकडे ती सुखरूप पोहोचली. ही घटना ९ आॅगस्ट रोजी थेऊर येथे घडली.
लोणी काळभोर : आपल्या कुटुंबीयांसमवेत अष्टविनायक यात्रेला निघालेल्या सोलापूर येथील भाविकाची अडीच वर्षे वयाची मुलगी थेऊर येथे विसरून राहिली. ३० किलोमीटर दूर गेल्यानंतर त्यांच्या गाडीत मुलगी नसल्याचे लक्षात आले. सुरक्षारक्षक विश्वस्त व व्यवस्थापक यांच्या सतर्कतेमुळे पुन्हा आई-वडिलांकडे ती सुखरूप पोहोचली. ही घटना ९ आॅगस्ट रोजी थेऊर येथे घडली.
सोलापूर जिल्ह्यातील खंडाळी गावाचे अमोल हरिदास लावंड हे आपली आई, पत्नी, दोन बहिणी, आत्या, एक भाऊ व सहा लहान मुले यांच्यासमवेत जीपने अष्टविनायक यात्रेसाठी निघाले होते. ते सर्वजण मोरगाव, सिद्धटेकचे दर्शन घेऊन दुपारी थेऊर येथे श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी आले. दर्शन घेतल्यानंतर ते सर्व जण काही वेळ तेथे थांबले. त्यानंतर २.३० वाजण्याच्या सुमारास ते रांजणगाव येथे दर्शनासाठी निघाले. त्यांची गाडी थेऊरपासून सुमारे ३० किलोमीटर गेली, त्या वेळी अमोल लावंड यांच्या बहिणीने मुलांना खाऊ म्हणून खोबºयाची बर्फी देण्यास सुरुवात केली. त्या वेळी अमोल यांची श्रेया ही मुलगी गाडीत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे सर्व जण चिंतेत पडले.
दरम्यानच्या काळात थेऊर येथील श्री चिंतामणीच्या मंदिरातील सुरक्षारक्षक मनीषा हरिहर व विजय कांबळे यांना मुख्य मंडपातील दानपेटीपाशी एक अडीच वर्षांची मुलगी रडत बसलेली दिसली. या दोघांनी तिची चौकशी केली. परंतु, घाबरल्यामुळे ती काहीच बोलत नव्हती. या मुलीला घेऊन ते दोघे सुमारे २० मिनिटे तेथेच थांबले. परंतु, तिला नेण्यास कोणीही न आल्याने त्यांनी या मुलीला चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त हभप आनंदमहाराज तांबे व व्यवस्थापक डॉ. मंगलमूर्ती पोफळे यांच्याकडे नेले. ही मुलगी कोणासमवेत आली, याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले. त्यामध्ये ही मुलगी एकटीच इकडेतिकडे फिरताना दिसत होती.
गाडीत आपली श्रेया न दिसल्याने अमोल लावंड यांनी गाडी परत थेऊरकडे वळवली. परंतु, नगर-पुणे महामार्गावर वहातूक जास्त असल्याने त्यांना लवकर मार्गक्रमणा करता येत नव्हते. सायंकाळी ५.३०च्या सुमारास हे सर्व चिंतामणीच्या मंदिरात पोहोचले व मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. चौकशी करीत ते मंदीर कार्यालयात आले त्या वेळी त्यांची श्रेया त्यांना खुर्चीवर बसलेली दिसली. आई-वडिलांना पाहताच धावत जाऊन ती त्यांचे कुशीत विसावली.
अमोल लावंड यांनी आपली श्रेया सुखरूप मिळाल्याबद्दल व तिचा सांभाळ केल्याबद्दल विश्वस्त, व्यवस्थापक व सुरक्षारक्षक यांचे हात जोडून आभार मानले व श्रेया हिला घेऊन ते रांजणगाव गणपतीकडे रवाना झाले.