...अन् क्षणार्धात निर्णय बदलला
By admin | Published: May 19, 2014 03:17 AM2014-05-19T03:17:29+5:302014-05-19T03:17:29+5:30
उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असल्याने मावळते रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाडेवाढीचा निर्णय घेतला आणि त्याबाबतच्या सूचनाही रेल्वे बोर्डाला दोन दिवसांत दिल्या.
मुंबई : उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असल्याने मावळते रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाडेवाढीचा निर्णय घेतला आणि त्याबाबतच्या सूचनाही रेल्वे बोर्डाला दोन दिवसांत दिल्या. त्यानुसार लोकसभा निवडणुकीची मतमोजणी संपताच एक्सप्रेस गाड्यांच्या आणि उपनगरीय लोकलच्या भाड्यात १० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. तसेच याची अंमलबजावणी २० मेपासून लागू केली जाणार होती. मात्र मावळत्या रेल्वेमंत्र्यांनी क्षणार्धात निर्णयात बदल करून भाडेवाढीच्या निर्णयाची जबाबदारी नवीन सरकारवर टाकत आपल्याकडून घेतलेला निर्णय मागे घेतला आहे. देशभरात रेल्वे प्रवाशांची संख्या ०.५३ टक्क्यांनी घटली असून, त्यामुळे उत्पन्नावर परिणाम होत आहे. मोठी भाडेवाढ गेल्या काही वर्षांत न केल्याने रेल्वेचे उत्पन्न वाढत नव्हते. हे पाहता १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आणि त्यावर रेल्वेमंत्र्यांकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. या भाडेवाढीमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांबरोबरच उपनगरीय लोकल प्रवाशांना फटका अधिक बसणार आहे. रेल्वेच्या मासिक आणि त्रैमासिक पासांच्या दरात मोठी वाढ होणार असल्याने मुंबईकरांच्या खिशाला तर कात्री लागणार आहे. ही भाडेवाढ होताना यावर ४.२ टक्के अधिभारही लागणार असल्याने पासाच्या दरात होणारी वाढ प्रवाशांना परवडणारी नाही. याची अधिसूचना रेल्वेकडून काढतानाच प्रसिद्धीपत्रकही लोकसभा मतमोजणीच्या दिवशी संध्याकाळपर्यंत काढले होते. (प्रतिनिधी)