...आणि श्रीपाल सबनिसांनी साहित्यिकांना उघडे पाडले!

By admin | Published: January 3, 2016 02:01 AM2016-01-03T02:01:09+5:302016-01-03T02:01:09+5:30

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नवनियुक्त अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या वादग्रस्त विधानांमुळे केवळ ते एकटे उघडे पडलेले नाहीत, तर समस्त मराठी साहित्यिकांच्या लिखाणांवरही

... and Shripal all the spectators open to the audience! | ...आणि श्रीपाल सबनिसांनी साहित्यिकांना उघडे पाडले!

...आणि श्रीपाल सबनिसांनी साहित्यिकांना उघडे पाडले!

Next

- अतुल कुलकर्णी (निमित्तमात्र )

मुंबई : अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नवनियुक्त अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या वादग्रस्त विधानांमुळे केवळ ते एकटे उघडे पडलेले नाहीत, तर समस्त मराठी साहित्यिकांच्या लिखाणांवरही भले मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. साहित्यिक हा समाजाचा आरसा असतो, त्याने समाजाला दिशा दिली पाहिजे, असे सांगितले जात असताना, आजच्या साहित्यात समाजाचे कोणतेच प्रतिबिंब कसे उमटत नाही आणि साहित्यिक रोजच्या जगण्याच्या व्यवहारापासून कसे तुटून गेले आहेत, हेही लख्खपणे समोर आले आहे, तसेच आपापल्या परिने समाजाशी नाळ जोडून लिखाण करणाऱ्या साहित्यिकांचाही सबनिसांच्या वक्तव्याने अवमान झाला आहे.
दुनियादारी, कट्यार काळजात घुसली किंवा नटसम्राट हे पन्नास साठ वर्षांपूर्वीचे विषय आजही सिनेमाच्या माध्यमातून लोकांच्या काळजात घर करतात. मात्र, दुसरीकडे आजच्या एखाद्या विषयावर अशी साहित्यकृती का तयार होत नाही, याचेही उत्तर सबनीस यांना द्यावे लागणार आहे. समकालीन प्रकाशनासारखी संख्या जाणीवपूर्वक वेगळ्या विषयावरची पुस्तके काढते, ज्याच्या अनेक आवृत्त्या निघतात, तो जागलेपणा संमेलनाचे अध्यक्ष झालेल्या सबनिसांना आहे की नाही, असाही प्रश्न त्यातून निर्माण झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला जरी अचानक गेले असे चित्र समोर आले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा गोष्टी अचानक होत नसतात. देशातल्या माध्यमांना आणि अमेरिकेसारख्या गुप्तहेर संघटनेपासूनही मोदींची भेट लपून राहिली हा खरा अभ्यासाचा विषय तमाम विचारवंत, अभ्यासक, साहित्यिकांसाठी असायला हवा होता. मात्र, सबनिसांनी हा विषय अत्यंत उथळपणे मांडला. शिवाय प्रख्यात कवी मंगेश पाडगांवकर यांच्या अंत्ययात्रेला मोजके ५० ते १०० लोकच कसे उपस्थित राहिले, याचे मनोज्ञ चिंतन सबनिसांनी केले असते, तर अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली असती.
मराठी साहित्य कथा, कादंबऱ्या, कवितांच्या पलीकडे गेले आहे. मात्र, मराठी पुस्तके हल्ली वाचली जात नाहीत, असे बेधडक विधानही सबनीस यांनी केले आहे. त्यांच्या माहितीसाठी काही उदाहरणे मुद्दाम सांगावी वाटतात. विश्वास पाटील यांनी लासलगावच्या कांदा व्यवहारावर ‘पांगिरा’ कादंबरी लिहिली, निवृत्त पोलीस अधिकारी अभिमन्यू सूर्यवंशी यांनी ‘कुण्या एकाची धरणगाथा’ हे पुस्तक एका सत्य कथेवर आधारित असूनही किती अस्वस्थ करते, हे वाचल्यावर कळेल. दिल्लीचा एक पत्रकार अमीन सेठी दोन वर्षे बांधकाम मजुरांमध्ये राहिला, त्यांचे जग त्याने पाहिले आणि ‘एक आझाद इसम’ हे पुस्तक त्याने लिहिले, अमिता नायडू नावाच्या महिलेने रेल्वे प्लॅटफॉर्मवर राहणाऱ्या मुलांचे आयुष्य त्यांच्यासोबत राहून पाहिले आणि ‘प्लॅटफॉर्म नंबर झिरो’ हे पुस्तक लिहिले. बरखा दत्त यांचे अनक्वाएट लँड, रोमिला थापर यांचे दि पास्ट एस प्रेझेन्ट, सलमान रश्दी यांचे टू इयर्स ऐट मन्थ्स, टष्ट्वेंटी एट नाइटस् किंवा निळू दामले यांचे साखर कारखान्यांच्या राजकारणावरचे पुस्तक असो किंवा अफगाणिस्तानच्या पार्श्वभूमीवरचे थाउजंड स्प्लेंडीड सन ही अगदीच मोजकी उदाहरणे आहेत.
येथे उल्लेख केलेल्या काही प्रयोगांच्या पाठीशी साहित्यिक किती वेळा ठामपणे उभे राहिले, याचेही उत्तर संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दिले पाहिजे. राज्यात दुष्काळ आहे, पाण्यासाठी गावच्या गावे स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे. समाजाची ऐकून घेण्याची मानसिकता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे, राजकारणी बेभान होताना दिसतात, महिला देशाच्या सर्वाेच्च पदी असतानाच, लहान मुलींवर अत्याचार होतात, टोकाचे विरोधाभास पावलोपावली दिसत आहेत, याचे कोणतेच प्रतिबिंब साहित्यिकांकडून का उमटत नाही, याचा शोध संमेलनाचे अध्यक्ष म्हणून घ्यायचा सोडून, मोदींनी काय करावे आणि काय नाही, यावर बोलून सबनिसांनी अध्यक्षपदाचीही बूज राखलेली नाही.
आपण लेखक आहोत, नेता नाही, याचे भान ठेवून मोदींची जी गोष्ट पटली नाही, त्यावर अभ्यासपूर्ण लेखन सबनीस करू शकले असते. मात्र, संमेलनाचे अध्यक्ष झालो की, विचारल्या जाणाऱ्या प्रत्येकच गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याचे काम ते करू लागले, तर लिखाणाचे काम मोदी, गडकरींनी करायचे का? मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्यिकांनी पुरस्कार परत करण्यापेक्षा, समाजाला, सरकारला मार्गदर्शन होईल, असे लिखाण केले पाहिजे, त्यांच्या अस्वस्थतेतून समाजाला दिशा मिळाली पाहिजे, असे विचार मांडले होते. साहित्यिकांना असे सल्ले देण्याची वेळ जर मुख्यमंत्र्यांवर येत असेल, तर साहित्यिकांनी आपले आत्मपरीक्षण केले पाहिजे. मात्र, सबनिसांच्या उथळ विधानांनी साहित्यात चांगले काम करणाऱ्यांचाही अवमान झाला आहे, हे नक्की.

Web Title: ... and Shripal all the spectators open to the audience!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.