..तर २६ जुलैपासून टॅक्सी-रिक्षा बेमुदत बंद
By admin | Published: June 21, 2016 02:31 PM2016-06-21T14:31:29+5:302016-06-21T15:05:31+5:30
ओला आणि उबेर या खासगी टॅक्सीसेवांना येत्या २६ जुलैपर्यंत कायद्याच्या कक्षेत आणले नाही तर, मुंबईच्या रस्त्यावर एकही टॅक्सी आणि रिक्षा धावणार नाही.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ - ओला आणि उबेर या खासगी टॅक्सीसेवांना येत्या २६ जुलैपर्यंत कायद्याच्या कक्षेत आणले नाही तर, मुंबईच्या रस्त्यावर एकही टॅक्सी आणि रिक्षा धावणार नाही. २६ जुलैपासून बेमुदत बंद पुकारू असा इशारा जय भगवान टॅक्सी-रिक्षा चालक मालक महासंघाने दिला आहे. जयभगवान टॅक्सी चालक मालक सेनेने आज आझाद मैदानात आंदोलन केले. यामध्ये टॅक्सी आणि रिक्षा चालक सहभागी झाले होते.
आंदोलनाला हिंसक वळण
जयभगवान महासंघाच्या आंदोलनाला यावेळी हिंसक वळण लागले. काही आंदोलकांनी इंडिया टीव्ही आणि झी मिडीयाची गाडी फोडली. या हल्ल्याच्या निषेधार्थ टीव्ही जर्नलिस्ट असोशिएशनचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत.
पोलिसांनी या प्रकरणी सिराज वारीस (३०), रामचंद्र राय (३३), अब्दुल वहाब शेख (३०), अजय जैस्वाल (३०), अनिलकुमार गौर (३४), परमेश्वर जाधव (३०) आणि इम्तियाज खान (४३) या सात जणांना अटक केली आहे. जयभगवान महासंघाचे अध्यक्ष बाबासाहेब सानप यांनी प्रसारमाध्यमांवरील हल्ल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. हल्ला करणारे संघटनेचे कार्यकर्ते नसल्याचा त्यांचा दावा आहे.