...अन् कैद्यांना अश्रू अनावर झाले !
By admin | Published: November 15, 2016 05:37 AM2016-11-15T05:37:44+5:302016-11-15T05:37:44+5:30
कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या काही कैद्यांनी सोमवारी आपल्या मुला-बाळांची ‘गळाभेट’ घेतली अन् अनेक वर्षांनी पोटच्या गोळ्याला आलिंगन
गणेश वासनिक / अमरावती
कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या काही कैद्यांनी सोमवारी आपल्या मुला-बाळांची ‘गळाभेट’ घेतली अन् अनेक वर्षांनी पोटच्या गोळ्याला आलिंगन देताना त्यांचे डोळे पाणावले. मुलांच्या तोंडून कुटुंबाची ख्याली-खुशाली जाणून घेताना अश्रू अनावर झाले होते. गतकाळातील कौटुंबिक स्मृतींमध्ये ते काही काळ हरवून गेलेत.
बालदिनानिमित्त राज्याच्या कारागृह प्रशासनाने कैद्यांसाठी ‘मुलांची गळाभेट’ हा अभिनव उपक्रम आयोजित केला होता. कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांच्या पुढाकारातून या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. विविध गुन्ह्यांची शिक्षा भोगत असलेल्या २५ कैद्यांच्या १८ वर्षांखालील ४० पाल्यांना गळाभेटीचा लाभ घेता आला. तब्बल तासभर चाललेल्या या कार्यक्रमात काही कैद्यांनी आपल्या मुलांना कवेत घेतले, काहींनी मुलांना कवटाळून अश्रूंना वाट मोकळी केली. यावेळी वऱ्हाड संस्थेमार्फत मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.