...आणि त्यांच्या मृत्यूचा स्मृतिवृक्ष झाला! - सुधीर मुनगंटीवार
By अतुल कुलकर्णी | Published: January 14, 2018 03:33 AM2018-01-14T03:33:23+5:302018-01-14T03:33:59+5:30
आजपर्यंत एखाद्या राजकीय पुढा-याच्या किंवा नेत्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ वृक्षारोपणाची सवय असणा-या परभणी जिल्ह्यातल्या गौर गावातील लोकांसाठी शुक्रवारचा दिवस वेगळाच होता. गावातील एक वनपाल सदाशिव त्र्यंबकअप्पा नागठाणे भोरच्या उपवन विभागाच्या हद्दीत जंगलास लागलेली आग विझविताना मृत्युमुखी पडले.
- वनांचे संरक्षण करणारा ‘पर्यावरण सैनिक’ असा केला नागठाणे यांचा उल्लेख
मुंबई : आजपर्यंत एखाद्या राजकीय पुढा-याच्या किंवा नेत्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ वृक्षारोपणाची सवय असणा-या परभणी जिल्ह्यातल्या गौर गावातील लोकांसाठी शुक्रवारचा दिवस वेगळाच होता. गावातील एक वनपाल सदाशिव त्र्यंबकअप्पा नागठाणे भोरच्या उपवन विभागाच्या हद्दीत जंगलास लागलेली आग विझविताना मृत्युमुखी पडले. वृक्ष संपदेचे रक्षण करताना त्यांचा जीव गेला या विचाराने अस्वस्थ झालेल्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागठाणे यांच्या पत्नीला नोकरीचे नेमणूकपत्र, १० लाखांचा धनादेश तर दिलाच पण या वनपालाचा मृत्यू हा राज्यभर स्मृतिवृक्ष संकल्पना राबविण्याची सुरुवात असेल, असेही जाहीर केले.
भोर उपवन विभागाच्या हद्दीत २८ डिसेंबर रोजी अचानक आग लागली. त्यानंतर बायरबिटरच्या साहाय्याने आग आटोक्यात आणताना वनरक्षक सदाशिव त्र्यंबकअप्पा नागठाणे गंभीररीत्या भाजून जखमी झाले होते. आग लागलेली जागा दुर्गम आणि अति उताराची होती. नागठाणे यांच्या अंगावर आगीचा लोळ आल्याने ते गंभीररीत्या भाजले. पुण्यातील सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना ३ जानेवारी रोजी त्यांचे निधन झाले.
हा मृत्यू वृक्षसंपदेसाठी प्राण देणाºया वन शहिदाचा आहे, असे सांगत वनमंत्र्यांनी नागठाणे यांचे परभणी जिल्ह्यातल्या पूणार तालुक्यातले मूळगाव गाठले. गावात ठिकठिकाणी नागठाणे यांना श्रद्धांजली वाहणारे फलक लावलेले. गावातल्या सोमेश्वर मंदिराजवळ गाडी थांबवून वनमंत्री आणि वनसचिव विकास खारगे पायीच त्यांच्या घराकडे गेले. त्यांच्या मुलाला छातीशी कवटाळून तुझ्या वडिलांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्राण दिले आहेत. त्याचे मोल शब्दातीत आहे, असे सांगितले तेव्हा जमलेल्या गावकºयांचेही वनमंत्री, असेही काही करू शकतो हे पाहून डोळे पाणावले. मुनगंटीवार, खारगे यांनी त्यांच्या वयोवृद्ध मातोश्रीची विचारपूस केली. नागठाणेंच्या पत्नी अर्चना, मुलगा सुमेश, मुलगी साक्षी यांची विचारपूस केली.
नागठाणे यांच्या मृत्यूनंतर अवघ्या आठ दिवसांच्या आत त्यांच्या पत्नीला वनविभागातच लिपिक म्हणून नोकरीचा आदेश घेऊन हे दोघे त्या गावात आले. नागठाणे यांना जणू शहिदासाठीचे सगळे मानसन्मान देण्यात आले. गावातील सोमेश्वर मंदिरात शोकसभा घेण्यात आली. त्याला सारा गाव लोटला. झाडावरून, घरांच्या गच्चीवरून बघ्यांची गर्दी झाली होती. मंदिराच्या आवारातच नागठाणे यांच्या स्मरणार्थ वनमंत्र्यांनी वृक्षारोपण केले. या वेळी वनमंत्र्यांनी नागठाणे यांचा उल्लेख वनांचे संरक्षण करणारा ‘पर्यावरण सैनिक’ असा केला तेव्हा सारा गाव गहिवरला. माता-भगिनींना आपले अश्रू आवरता आले नाहीत. वनमंत्र्यांनी गावाला ५० लाख रुपयांची देणगी देणार असल्याचे जाहीर केले.