...अन् ट्रान्सफॉर्मर हलवला दुसरीकडे
By Admin | Published: March 3, 2017 01:24 AM2017-03-03T01:24:14+5:302017-03-03T01:24:14+5:30
जिल्हा परिषद शाळेजवळील ट्रान्सफॉर्मरचे खांब शाळेवर झुकून विद्युतवाहक तारा शाळेच्या पत्र्यांवर लोंबकळत होत्या
तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील चिखली येथील जिल्हा परिषद शाळेजवळील ट्रान्सफॉर्मरचे खांब शाळेवर झुकून विद्युतवाहक तारा शाळेच्या पत्र्यांवर लोंबकळत होत्या. याबाबत ‘लोकमत’ने वारंवार आवाज उठवत वेळोवेळी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले. प्रशासनाने याची तत्काळ दखल घेत हा ट्रान्सफॉर्मर दुसरीकडे हलविण्यात आला.
चिखली गावांमध्ये असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेशेजारील ट्रान्सफॉर्मरच्या तारा शाळेच्या भिंतीवर व पत्र्यांवर टेकल्यामुळे विजेचा प्रवाह चालू असताना या भिंती व पत्र्यांमध्ये विजेचा शॉक उतरत होता, तर याच ट्रान्सफॉर्मरचे खांब शाळेवरती झुकलेले होते. यामुळे या शाळेतील लहान मुलांना, परिसरातील ग्रामस्थांना हा ट्रान्सफॉर्मरचा धोका केव्हाही संभवला जाऊ शकला असता.
नेहमीच वर्दळीच्या असणाऱ्या रस्त्याच्या कडेलाच हा ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या ग्रामस्थांनाही जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत असे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळेच्या परिसरामध्ये असल्यामुळे लहान मुलांचा नेहमीचाच या ठिकाणी वावर होता. (वार्ताहर)
पावसाळ्यामध्ये या शाळेला पूर्णपणे शॉक येत असल्याची माहिती शिक्षक व ग्रामस्थांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना देऊनही हे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते. याचीच दखल घेत लोकमतने याचा पाठपुरावा करत याबाबतची वृत्ते वारंवार प्रसिद्ध केली. यामुळे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाग येत हा ट्रान्सफॉर्मर तत्काळ दुसऱ्या सुरक्षिततेच्या ठिकाणी हलविण्यात आला आहे.
चिखली येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व ग्रामस्थ शिवसेनेचे आदिवासी नेते विजयराव आढारी, अनिताताई आढारी, सरपंच चिंतामण आढारी, साहेबराव भालेराव, संतोष भालेराव, सीताराम उंडे यांनी ‘लोकमत’चे कौतुक करत
आभार मानले.