....आणि आदिवासी आश्रमशाळेच्या मुलींच्या चेहऱ्यावर फुलले हसू !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 08:27 PM2018-02-20T20:27:45+5:302018-02-20T21:17:33+5:30
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आलमे येथील शासकीय अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना आलेल्या पाहुण्याबद्द्दल जितकी उत्सुकता होती तितकीच त्यांच्याशी मासिक पाळीबद्दल कसं बोलावं याबद्दल लाजही होती.
मनोहर कुंभेजकर
मुंबई- पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आलमे येथील शासकीय अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना आलेल्या पाहुण्याबद्द्दल जितकी उत्सुकता होती तितकीच त्यांच्याशी मासिक पाळीबद्दल कसं बोलावं याबद्दल लाजही होती. मात्र वर्सोवा विधानसभेच्या भाजपा आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्याशी संवाद साधून सगळ्या शंकांचं निरसन झालं आणि आश्रमशाळेच्या या आदिवासी मुलींच्या चेहऱ्यावर हसू उमलले.
आमदार डॉ. लव्हेकर यांनी विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप केले. या अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत 'ती फाउंडेशन सॅनिटरी पॅड बँके ' तर्फे दरमहा मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी के पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष व प्रभाग क्रमांक 60 चे भाजपा नगरसेवक योगीराज दाभाडकर हे देखील उपस्थित होते. आज वर्सोवा स्वामी समर्थ नगर येथील म्हाडा वसाहतीतील त्यांच्या कार्यलयात भेट घेतली असता त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.
जुन्नर तालुक्यातील ज्ञानदा शिक्षण मंडळ, नारायण गाव संचालित शासकीय अनुदानित आदिवासी आश्रमशाळा असून या शाळेतील ५५ गरीब आदिवासी विद्यार्थिनींना मासिक पाळी येते. आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थिनींच्या गरीब परिस्थितीमुळे त्या सॅनिटरी नॅपकिन विकत घेऊ शकत नाही, त्यामुळे या ५५ विद्यार्थिनींना नियमितरित्या दरमहा १० सॅनिटरी नॅपकिन्स मोफत उपलब्ध करून दयावेत अशी मागणी आमदार डॉ.लव्हेकर यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.त्यांनी ही मागणी मान्य करून आश्रमशाळेला नुकतीच भेट दिली.यावेळी मुलींनीही अनेक प्रश्न विचारून मनसोक्त गप्पा मारल्या.त्यांनी विद्यार्थिनीच्या आरोग्यविषयक तक्रारींची अनौपचारिक संवाद साधत विद्यार्थिनींना येणारी अनियमित पाळी, रक्तस्त्राव आदींबद्दल माहिती जाणून घेतली. विद्यार्थिनींच्या सोयीसाठी 'ती फाउंडेशन सॅनिटरी पॅड बँके ' तर्फे दरमहा मोफत १० सॅनिटरी नॅपकिन पुरवण्यात येणार आहेत. विद्यार्थिनींचे आरोग्य अबाधित राहावे यादृष्टीने ' ती फाउंडेशन सॅनिटरी पॅड बँके' द्वारे डॉक्टरांचे १ पथक नियमितरित्या या आश्रम शाळेमध्ये पाठवण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी लोकमतशी बोलताना दिली.
आमदार डॉ. लव्हेकर या 'ती फाउंडेशन सॅनिटरी पॅड बँके ' च्या संस्थापक अध्यक्ष असून महिलांच्या त्या ५ दिवसांच्या वेदना अधिक सुसह्य करून त्यांना सॅनिटरी पॅड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहेत. 'ती सॅनिटरी पॅड बँके' च्या माध्यमातून सॅनिटरी पॅड्सचे मोफत वाटप, मोफत सॅनिटरी पॅड एटीएम व्हेंडिंग मशीन, डिस्पोझल मशिन्स, मॅनस्ट्रुअल हेल्थ किटची सुविधा उपलब्ध करून दिली जाते तसेच महिलांना स्त्रीरोगतज्ज्ञांचा मोफत सल्लाही उपलब्ध करून दिला जातो. 'ती सॅनिटरी पॅड बँके' तर्फे दरमहा गरीब विद्यार्थिनी आणि स्त्रियांना १० सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप केले जाते. मेन्स्ट्रुअल हेल्थ किटमध्ये विविध सूचना, मानसिक आधार देण्यासाठीची माहिती, २ निकर्स, पेनकिलर्स आणि सॅनिटरी नॅपकिन या गोष्टी देण्यात येतात अशी माहिती त्यांनी शेवटी दिली.